छत्रपती संभाजीनगर : शिवाजीनगर भुयारी मार्गाच्या स्लॅबमधून गळती रोखण्याचे काम अखेर हाती घेण्यात आले आहे. ‘पू इंजेक्शन ग्राउटिंग’च्या मदतीने भुयारी मार्गाच्या जाॅइंटमधील गळती रोखली जात आहे.
पावसाळा सुरू झाल्यापासून भुयारी मार्गाची समोर आलेली अवस्था चर्चेत आहे. भुयारी मार्गात पाणी साचण्याचा प्रकार होत आहे. त्यातच याठिकाणी स्लॅबमधून पाण्याची गळती होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. ‘लोकमत’ने सर्वप्रथम ११ ऑगस्ट रोजी सविस्तर वृत्त प्रकाशित करून हा प्रकार समोर आणला. या वृत्ताची दखल घेत अखेर याठिकाणची गळती रोखण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पावसामुळे त्यात काहीसा व्यत्यय येण्याची शक्यता आहे. काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा तपासणी केली जाईल. गळती पूर्णपणे थांबल्यानंतरच काम पूर्ण झाल्यावर ‘शिक्कामोर्तब’ केला जाणार आहे.
रस्ता निसरडा, ड्रेनेजमध्ये चिखलरस्त्यावरून वाहत येणाऱ्या पाण्यासोबत मोठ्या प्रमाणात माती येते. उतार असल्याने भुयारी मार्ग निसरडा झाला आहे. त्यातूनच दुचाकी घसरून चालक जखमी होण्याच्या घटना घडत आहेत. त्यातच पाणी वाहून जाण्यासाठी असलेल्या ड्रेनेजमध्येही वारंवार चिखल जमा होत आहे. त्यामुळे भुयारी मार्ग तुंबतच आहे.