विनोद जाधव , लासूर स्टेशन राजकीय पुढार्यांसाठी वरदान ठरलेल्या शिल्लेगाव मध्यम प्रकल्पात गेल्या दोन वर्षांपासून एक थेंबही पाणी नाही. निसर्गकृपेने यंदा तरी या प्रकल्पात चांगल्याप्रकारे पाणी यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. शिरेगाव व देवळी या दोन गावांना स्थलांतरित करून शिल्लेगाव मध्यम प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. २००४ साली सांडवा बंद करण्यात आला. पाणी अडवून आजघडीला तब्बल ९ वर्षांचा काळ लोटला असून एकदाही हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला नाही. या प्रकल्पाचे अपयश पुढार्यांच्या चांगलेच पथ्यावर पडले. अनेक निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या प्रकल्पात इकडून पाणी आणा, तिकडून पाणी आणा या मुद्यावर आंदोलने उभारून आपले राजकीय डावपेच मोठ्या प्रमाणात यशस्वी करून घेतले; मात्र या प्रकरणी जो प्रामाणिक पाठपुरावा आवश्यक होता, तो करण्यात आला नाही. त्याची परिणीती म्हणून आजही हा प्रकल्प पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. प्रकल्प चुकीचा अडीच हजार एकर सिंचन क्षेत्र व पन्नास गावांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या प्रकल्पामुळे होणार, असे कागदोपत्री झालेल्या नियोजनावरून दिसते व तसे ते शक्यदेखील आहे; परंतु ते हा प्रकल्प शंभर टक्के भरला तर; परंतु झालेल्या ठिकाणी हा प्रकल्प चुकीचा असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींनी सांगितले, तसेच हा प्रकल्प पावसावर भरणे शक्य नसून ज्या वर्षी हा प्रकल्प पावसाच्या पाण्यावर भरेल त्यावर्षी या परिसरात अतिवृष्टीची शक्यता नाकारता येत नाही, असेही त्यांनी सांगितले. गेल्या दोन वर्षांपासून या प्रकल्पात एक थेंबभरदेखील पाणी नसल्याने परिसर पाण्यावाचून कासावीस झाला आहे.
शिल्लेगाव प्रकल्प २ वर्षांपासून कोरडा
By admin | Updated: June 2, 2014 01:33 IST