जालना : शहरासह जिल्ह्यातील खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने कोट्यवधी रूपये खर्च करून जिल्हा क्रीडा संकुल उभारण्यात आले आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून या क्रीडा संकुलाची अवस्था भयावह झाली आहे. जालना शहरातील हे क्रीडा संकुलत राज्यस्तरीय बनविण्यात आले आहे. या ठिकाणी इनडोअर खेळांसाठी वेगळा हॉलही बांधण्यात आलेला आहे. या संकुलात होणार्या विविध स्पर्धांचा क्रीडाप्रेमींना आनंद लुटता यावा यासाठी याठिकाणी दोन प्रेक्षक गॅलरी बांधण्यात आल्या होत्या. त्यावर लोखंड आणि पत्र्याचे शेडही उभारण्यात आले होते. मात्र, दोन वर्षापूर्वी झालेल्या वादळी वार्यासह पावसामुळे क्रीडा संकुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. प्रेक्षक गॅलरीवरील पत्रे लोखंडी अँगल्ससह उडून गेले. त्याची दुरूस्ती अद्यापपर्यंत करण्यात आली नाही. या मैदानावर शालेय, तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय स्पर्धा नियमितपणे आयोजित करण्यात येतात. विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यांपूर्वी राष्ट्रीय व राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्याही याच संकुलात घेण्यात आल्या. या स्पर्धांसाठी राज्यासह देशभरातील खेळाडू, प्रशिक्षक व क्रीडाप्रेमी स्पर्धा पाहण्यासाठी दाखल झाले होते. मात्र, तेव्हाही या संकुलाची दुरूस्ती केली गेली नाही. स्वच्छतागृहांचीही ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशी झालेली आहे. स्वच्छतागृहातील बेसीन वगैरे साहित्य गायब झाले आहेत. या ठिकाणी पाण्याचीही व्यवस्था नसल्यामुळे खेळाडूंसह क्रीडाप्रेमींची कुचंबणा होत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन प्रेक्षक शेडसह इतर सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी खेळाडूंसह क्रीडाप्रेमींतून होत आहे. (प्रतिनिधी) खेळाडू व क्रीडाप्रेमींमधून नाराजीचा सूर जिल्हा क्रीडा संकुल हे राज्यस्तरीय दर्जाचे आहे. त्यामुळे या ठिकाणी खेळाडू, प्रशिक्षक व क्रीडाप्रेमींसाठी सर्व सोयी-सुविधा असणे अपेक्षित आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
शेड दुरूस्तीच्या प्रतीक्षेत!
By admin | Updated: May 10, 2014 19:08 IST