जालना : जिल्ह्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आता उन्हाळ्यातील पाणीपुरवठ्याचे नियोजन नगरपालिकेने केले असून सात दिवसाआड पाणी देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र उन्हाळ्यात पिण्याचे पाणी अधिक लागत असल्याने पाणी असूनही टंचाई जाणवेल, अशी स्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.शहराला दररोज ४८ एमएलडी पाण्याची गरज आहे. पाणीपुरवठ्याचे नियोजन करताना शहरात ४३ झोन पाडण्यात आलेले आहेत. दररोज जायकवाडी जलाशयातून १८ एमएलडी तर घाणेवाडी जलाशयातून ५ एमएलडी पाण्याचा उपसा केला जातो. त्यामुळे दररोज २३ एमएलडी पाणी शहराला मिळते. अंतर्गत जलवाहिनी कालबाह्य झाल्याने यापैकी काही पाणी वाया जाते. या पार्श्वभूमीवर सद्यस्थितीत सात दिवसाआड होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे नियोजन नगरपालिकेने उन्हाळ्यातही कायम ठेवण्याचा निर्धार केला आहे.त्यापेक्षा कमी दिवसाआड पाणीपुरवठा व्हावा, यासाठी आगामी काळात प्रयत्न राहणार असल्याचे सांगण्यात आले. योजनेदरम्यान बंदोबस्तासाठी फिरते पोलिस व नगरपालिका कर्मचारी पथक ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ४ पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता आर.यू. बगळे म्हणाले, पाणीपुरवठ्याचे नियोजन केलेले असून सात दिवसाआड पेक्षा कमी कालावधी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. पाणीपुरवठ्याचा वेळ वाढवून देण्याचाही प्रयत्न असल्याचे बगळे यांनी सांगितले.४शहरातील अंतर्गत जलवाहिन्यांसाठीचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. तो तात्काळ निकाली निघावा, अशी मागणी शहरातील जनतेतून होत आहे. घाणेवाडी आणि जायकवाडी धरणात मुबलक पाणीसाठा आहे. परंतु नगरपालिकेच्या नियोजनाअभावी शहरात पाणीपुरवठा पुरेसा व व्यवस्थित होत नाही. असेच राहिले तर उन्हाळ्यात नागरिकांची मोठी अडचण होईल. पाणी आहे, परंतु त्याचे वितरण व्यवस्थित होत नाही, हीच जालन्यातील नागरिकांची शोकांतिका आहे. सुनील रायठठ्ठा, घाणेवाडी जलसंरक्षण मंच, जालना
सात दिवसांआड पाणी
By admin | Updated: February 8, 2015 00:10 IST