अशोक कारके, औरंगाबादराज्यातील सर्वच विद्यापीठांनी महाविद्यालय आणि कोर्सची अपूर्ण माहिती दिल्यामुळे बहुतांशी महाविद्यालये आणि कोर्सचे नाव समाजकल्याण विभागाच्या शिष्यवृत्तीच्या संकेतस्थळावर येत नाही, त्यामुळे शिष्यवृत्तीचे अर्ज भरताना विद्यार्थ्यांची तारांबळ होत आहे. हा प्रश्न नोब्हेंबरपर्यंत कायम राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.गेल्या वर्षीची शिष्यवृत्तीची माहिती नष्ट केल्यामुळे विद्यापीठांकडून महाविद्यालय आणि कोर्सची माहिती मागविण्यात आली होती. विद्यापीठाने दिलेली माहिती शिष्यवृत्तीची साईट अपडेट करणाऱ्या खाजगी संस्थेने साईटवर टाकली आहे. राज्यातील सर्वच विद्यापीठांनी माहिती अपूर्ण दिल्यामुळे अनेक महाविद्यालयांचे आणि कोर्सचे नाव संकेतस्थळावर दिसत नाही. गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी समाजकल्याणच्या शिष्यवृत्तीचे अर्ज आॅनलाईन भरण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. विद्यार्थी आॅनलाईन अर्ज भरताना महाविद्यालय आणि कोर्सचे नाव साईटवर नसल्यामुळे इंटरनेट कॅफे, महाविद्यालये आणि समाजकल्याण कार्यालयाच्या खेट्या मारीत आहेत. हा प्रश्न सोडविण्यासाठी नुकतीच पुणे येथे बैठक घेण्यात आली. बैठकीत अधिकाऱ्यांनी राज्यात बहुतांशी महाविद्यालये आणि कोर्सचे नाव साईटवर नसल्याचे सांगितले. शिष्यवृत्तीचे संकेतस्थळ अपडेट करण्यासाठी एक नोव्हेंबरपर्यंत वेळ लागणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यात ६६३ महाविद्यालये आहेत. यापैकी पन्नास टक्के महाविद्यालयांची नावे आणि अभ्यासक्रमांसंबंधी समस्या आहे. महाविद्यालयाचे नाव आणि अभ्यासक्रमांची ताजी माहिती संकेतस्थळावर देण्यासाठी १ आॅक्टोबर रोजी संबंधित महाविद्यालयांना प्रपत्र अ भरण्याचे आदेश समाजकल्याण विभागाने दिले होते. जवळपास दोनशे महाविद्यालयांनी प्रपत्र अ भरून दिले आहे. ज्या महाविद्यालयांनी प्रपत्र अ भरून दिले नाही, अशा महाविद्यालयांनी १८ आॅक्टोबरपर्यंत भरून द्यावे, अन्यथा कारवाई करण्यात येणार आहे, असे समाजकल्याण अधिकाऱ्यांनी सांगितले.
शिष्यवृत्तीचे संकेतस्थळ; समस्या नोव्हेंबरपर्यंत राहणार
By admin | Updated: October 15, 2014 00:48 IST