औरंगाबाद : जिल्ह्यात ११ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत अशंत: तर आठवड्यातील प्रत्येक शनिवार आणि रविवारी पूर्ण लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे.
लॉकडाऊनच्या कळात सोमवार ते शुक्रवारपर्यंत सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत शहर आणि ग्रामीण भागातील जनजीवन सुरळीत राहील. प्रशासनाने सूट दिलेल्या आणि सशर्त परवानगी दिलेल्या यंत्रणाच या काळात सुरू राहणार आहेत. संयुक्तपणे सर्व प्रशासकीय यंत्रणा या काळात एकत्रित काम करणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. बुधवारी मुख्य सचिव आणि केंद्रीय पथकाने औरंगाबाद जिल्ह्यातील रुग्णवाढीच्या अनुषंगाने चिंता व्यक्त केली आहे. केंद्रीय पथकाने देखील प्रशासनाला सतर्कतने काम करण्याच्या सूचना केल्या आहे. येणाऱ्या पंधरवड्यात सक्षमतेने काम करावे लागणार असून नागरिकांनादेखील स्वत:ची काळजी घ्यावी लागणार आहे.
या संस्थांना मुभा राहील
शनिवार आणि रविवार १०० टक्के लॉकडाऊन करण्यात येणार आहे. या काळात वैद्यकीय सेवा, वृत्तपत्र, मीडिया सेवा, दूध व्रिक्री व पुरवठा इ. भाजीपाला विक्री व पुरवठा, फळेविक्री व पुरवठा, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, पेट्रोलपंप, गॅस एजन्सी, सर्व प्रकारच्या वाहतूक सेवा, बांधकामे, उद्योग व कारखाने, किराणा दुकाने, मांसविक्री दुकाने, वाहन दुरुस्ती दुकाने, गॅरेज, वर्कशॉप, पशुखाद्य दुकाने, बँक व पोस्ट सेवा सुरू राहतील.
या संस्था बंद असतील
दुकाने व बाजारपेठा, शॉपिंग मॉल्स, मॉल्स, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, हॉटेल, रेस्टॉरंट (फक्त होम डिलीव्हरीला मुभा ), खासगी कार्यालय, आस्थापना बंद असतील.