औरंगाबाद : पिसादेवी येथील रुख्मिणी स्क्वेअर अपार्टमेंटमध्ये १५ फेब्रुवारी राेजी रात्री पत्नीच्या डोक्यात डंबेल्सने प्रहार करून तिचा खून केला व बाहेरून दरवाजाला कुलूप लावून पती फरार झाला होता. महिनाभराच्या आत या गुन्ह्याची उकल करून फरार पतीला गजाआड करण्यात चिकलठाणा पोलिसांना अखेर यश आले आहे.
सिद्धेश गंगाशंकर त्रिवेदी (३५, रा. रुख्मिणी स्क्वेअर अपार्टमेंट, पिसादेवी), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. प्लॉट विकत घेण्यासाठी सिद्धेशने पत्नी कविता सिद्धेश त्रिवेदी (३२) हिच्या कपाटातील सोन्याचा हार व मंगळसूत्र गुपचूप विकले होते. कपाटातून दागिने अचनाक गायब कसे झाले, याचा जाब कविताने विचारल्यानंतर सिद्धेशने ९५ हजारांत दागिने मोडल्याचे सांगितले. त्यावरून १५ फेब्रुवारी रोजी रात्री दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. काही केल्याने कविता माघार घेत नाही, हे लक्षात येताच सिद्धेशने तिच्या डोक्यात डंबेल्स मारून तिचा खून केला व तो थेट औरंगाबादबाहेर जाऊन लपला. पोलिसांनी त्याच्या शोधार्थ जंगजंग पछाडले; परंतु त्याचा माग सापडत नव्हता; पण म्हणतात ना की, ‘कानून के हात लंबे होते है.’ पोलिसांनी खबऱ्याचे नेटवर्क अधिक सतर्क केले तेव्हा तो अलीकडच्या काही दिवसांत दीव-दमण या केंद्रशासित प्रदेशात काही दिवसांपासून लपून बसला असल्याची पक्की खबर मिळाली. त्यानुसार चिकलाठाणा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रदीप ठुबे, हवालदार रवींद्र साळवे, दीपक सुराशे व एस.बी. घुगे हे खाजगी वाहनाने येथून १२ मार्च रोजी दीव-दमणकडे रवाना झाले. हजार किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सायंकाळी पोलिसांचे पथक तेथे पोहोचले व सिद्धेशला जेरबंद केले.
मुलांनाही केली होती मारहाण१५ फेब्रुवारी रोजी रात्री रागाच्या भरात सिद्धेशने कविताच्या डोक्यात डंबेल्सने प्रहार केला. ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. आपल्या आईला मारताना मुलगा रुद्र (८) व मुलगी त्रिशा (३) यांनी पाहिले व ते जोरजोरात रडू लागले. त्यामुळे त्यांना गप्प करण्यासाठी सिद्धेशने त्यांनाही मारहाण केली व त्या दोन्ही लहान मुलांना कविताच्या मृतदेहाजवळ सोडून दरवाजाला बाहेरून कुलूप लावले तो स्कूटी घेऊन निघून गेला. दुसऱ्या दिवशी मयत कविताचे वडील जगदीश ईश्वरराव अवस्थी (रा. लोहोणेर, जि. नाशिक) यांनी याप्रकरणी सिद्धेश त्रिवेदीविरुद्ध चिकलठाणा ठाण्यात तक्रार दाखल केली.