छत्रपती संभाजीनगर : ऐन सणासुदीत एसटी महामंडळाने आर्थिक कोंडीचे कारण देत राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचे ५६ टक्केच वेतन देण्याचा निर्णय घेतला. यात जिल्ह्यातील २ हजार ५४४ कर्मचाऱ्यांनाही ५६ टक्केच वेतन देण्यात आले. याविषयी कर्मचाऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना गेली काही महिने उशिराने वेतन मिळत असल्याच्या अडचणीला सामोरे जावे लागत होते. त्यात आता अर्धाच पगार करण्यात आल्याने एसटी कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. सणासुदीत अर्ध्या पगारात काय काय करणार, असा सवाल कर्मचाऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे. उर्वरित वेतन कधी होईल, हे कोणीही सांगत नसल्याचे एसटी कर्मचाऱ्यांनी सांगितले.
वेतन थांबवू शकत नाहीऐण सणासुदीच्या तोंडावर ५६ टक्के वेतन करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. अशा प्रकारे वेतन कायद्याने थांबविता येत नाही.- मच्छिंद्र बनकर, राज्य चिटणीस, एसटी कष्टकरी जनसंघ
आधीच संकटातएसटी कर्मचारी आधीच संकटात आहेत. गेल्या ६ महिन्यांपासून महागाई भत्ता मिळालेला नाही. त्यात आता ५६ टक्के वेतन देण्यात आले. यातून कर्मचाऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलले तर कोण जबाबदार राहील, असा प्रश्न आहे.- मकरंद कुलकर्णी, मुख्य मार्गदर्शक, शिव परिवहन वाहतूक कामगार सेना
एसटी अधिकारी गप्पएसटी कर्मचाऱ्यांना ५६ टक्के वेतन करण्याचे कारण विचारले असता, एसटी महामंडळाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी बोलण्यास नकार दिला. वरिष्ठ पातळीवरील हा निर्णय असल्याचे सांगण्यात आले.