मुजीब देवणीकरऔरंगाबाद : शहरात एक- एक थेंब पाण्यासाठी नागरिक त्रस्त आहेत. उन्हाळा संपत आला तरी महापालिकेला पाणीपुरवठ्याचे नियोजन करता आलेले नाही. किमान पिण्यासाठी तरी पाणी द्या, अशी मागणी घसा कोरडा करून नागरिक करीत आहेत. त्यानंतरही प्रशासनाला पाझर फुटायला तयार नाही. महापालिकेचे शुद्ध प्रक्रिया केलेले १ लाख लिटर पाणी दररोज एस. टी. महामंडळाला देण्यात येत आहे. या पाण्याचा वापर महामंडळ अक्षरश: बसेस धुण्यासाठी करीत असल्याची संतापजनक बाब समोर आली आहे. मागील सहा महिन्यांपासून पाण्याचे बिलही थकीत आहे.जायकवाडी धरणाने यंदा तळ गाठला आहे. धरणाच्या मृतसाठ्यातील पाणी आपत्कालीन पंपांद्वारे मनपाच्या उद्भव विहिरीपर्यंत मोठ्या कसरतीने आणण्यात येत आहे. जायकवाडीहून २० टक्के पाणी अगोदरच मनपाला कमी मिळत आहे. शहरात दररोज १२० एमएलडी पाणी येत आहे. शहराची मागणी २२० एमएलडी आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे कोणतेच नियोजन नाही. त्यामुळे अनेक नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. २०० पेक्षा अधिक वसाहतींमध्ये मनपाच्या जलवाहिन्या नाहीत. त्यामुळे त्यांना टँकरद्वारे पाणी देण्यात येत असल्याचा दावा प्रशासन करीत आहे. हा दावाही फोल ठरल्याचे निदर्शनास येत आहे. सिडको-हडकोसह जालना रोडवरील विविध वॉर्डांमध्ये आजही आठव्या आणि दहाव्या दिवशी पाणीपुरवठा होत आहे. पाण्यासाठी दररोज एन-५, एन-७ येथील जलकुंभावर आंदोलने होत आहेत.शहरात पाणी कमी पडत असल्याने मनपाने एमआयडीसीच्या जलवाहिनीवरून टँकर भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. नागरिकांना समाधानकारक पाणी मिळावे म्हणून विभागीय आयुक्त सकारात्मक प्रयत्न करीत आहेत. दुसरीकडे मनपा प्रशासन कोटला कॉलनी येथील जलकुंभावरून एस. टी. महामंडळाला आठ ते दहा टँकरद्वारे दररोज १ लाख लिटर पाणी देत आहे. या पाण्याचा वापर महामंडळ बसेस धुण्यासाठी करीत असल्याची माहिती मनपातील सूत्रांनी दिली. मागील सहा महिन्यांपासून महामंडळाने पाण्यापोटी मनपाला एक रुपयाही दिला नाही.वाढीव पाण्याची मागणीघाटी रुग्णालयाने ६३ कोटी रुपये खर्च करून सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभे केले. या रुग्णालयाला लागणारे पाणी मनपा देण्यास तयार नाही. फक्त पाण्याअभावी रुग्णालयाचे लोकार्पण थांबले आहे. त्यापाठोपाठ विमानतळ प्राधिकरण, पोलीस आयुक्तालयानेही वाढीव पाण्याची मागणी केली आहे. मनपाकडेच पाणी नाही, तर देणार कोठून, असा सवाल प्रशासनाकडून उपस्थित करण्यात येत आहे.शहराचा पाणीपुरवठा१२० एमएलडी पाण्याची शहरात आवक२२० एमएलडी पाण्याची शहराला गरज७-८ दिवसांआड सिडकोत पाणीपुरवठा०५ दिवसांआड शहागंज भागात पाणी०१ मार्चपासून शहरात पाणी प्रश्न गंभीर६० जलकुंभांद्वारे शहरात पाणीपुरवठ्याचे वितरण०४ वाजता पहाटेपासून रात्री १२ पर्यंत पाण्याचे वितरण१०५ टँकरद्वारे २०० वसाहतींना पाणीपुरवठ्याचे वितरण
एस. टी. बसेस धुण्यासाठी शुद्ध १ लाख लिटर पाण्याचा वापर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 23:37 IST
शहरात एक- एक थेंब पाण्यासाठी नागरिक त्रस्त आहेत. उन्हाळा संपत आला तरी महापालिकेला पाणीपुरवठ्याचे नियोजन करता आलेले नाही. किमान पिण्यासाठी तरी पाणी द्या, अशी मागणी घसा कोरडा करून नागरिक करीत आहेत
एस. टी. बसेस धुण्यासाठी शुद्ध १ लाख लिटर पाण्याचा वापर!
ठळक मुद्देशहरात पाण्यासाठी नागरिक त्रस्त : सहा महिन्यांपासून मनपाला पाण्याचे बिलही दिले नाही