लोकमत न्यूज नेटवर्कपैठण : कार्तिकी एकादशीनिमित्त पैठण शहरात मंगळवारी (दि.३१) भक्तांचा जनसागर उसळला होता. पहाटेपासूनच भाविकांनी गोदावरी नदीत स्नान करून नाथ समाधी व नाथांच्या वाड्यातील पांडुरंगाचे दर्शन घेतले.मंगळवारी पहाटे नाथ समाधी मंदिरातील व नाथवाड्यातील धार्मिक विधीसह विजयी पांडुरंगाच्या मूर्तीचा महाभिषेक रघुनाथ महाराज पालखीवाले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.यानिमित्त मंदिरात चोख पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. शहरातील मठ-मंदिरांमध्ये वारकरी सांप्रदायांकडून कीर्तने, भजने आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाविकांना उपवासाचे पदार्थ मोफत वाटप करण्यात येत होते.कार्तिकी एकादशीची महती विशद करताना दिनेश पारीख महाराज म्हणाले की, आजच्या दिवशी नाथांचे पणजोबा भानुदास महाराज यांनी कर्नाटकातील विजयानगरच्या अनागौदी येथील कृष्णदेव राजा यांच्याकडून शके १४२८ इ.स. १५०६ मध्ये महाराष्ट्राचे कुलदैवत पुन्हा पंढरपुरात आणून पांडुरंगाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली होती. आज या घटनेला (दि.३१), (शके १९३९) कार्तिकी एकादशीला ५११ वर्षे पूर्ण झाली. आजही पंढरपूरच्या पांडुरंग मंदिरात भानुदास महाराजांची समाधी आहे.
पैठणमध्ये भक्तांचा मेळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 00:13 IST