कोरोना रोखण्याची आता ‘आरटीओ’वरही जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:28 IST2020-12-17T04:28:47+5:302020-12-17T04:28:47+5:30

औरंगाबाद : आरटीओ कार्यालयाकडून कर थकलेला, योग्यता प्रमाणपत्र नसलेल्या आणि वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जाते. मात्र, ...

The RTO is now also responsible for preventing corona | कोरोना रोखण्याची आता ‘आरटीओ’वरही जबाबदारी

कोरोना रोखण्याची आता ‘आरटीओ’वरही जबाबदारी

औरंगाबाद : आरटीओ कार्यालयाकडून कर थकलेला, योग्यता प्रमाणपत्र नसलेल्या आणि वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जाते. मात्र, आता यासोबत आरटीओ कार्यालयावर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीचीही जबाबदारी पडली आहे. त्यामुळेच गेल्या २ दिवसांतील कारवाईत नियमांच्या उल्लंघनासह मास्क नसलेल्या चालकांवरही ‘आरटीओ’ पथकाने कारवाईचा बडगा उगारला आहे.

आरटीओ कार्यालयातर्फे कोरोना विळख्याच्या ९ महिन्यांनंतर प्रथम शनिवार आणि रविवारी विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. यासाठी ६ पथके नेमण्यात आली आहेत. नियमांचे उल्लंघन करीत रस्त्यांवरून धावणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. दोन दिवसांत तब्बल २४७ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या वाहनांत जेसीबी, क्रेन, ट्रॅक्टर, बस, मालवाहतूक वाहने, रिक्षा आदी वाहनांचा समावेश आहे. यामध्ये मास्क न घालता वाहन चालविणाऱ्या चालकांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली. प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

७९ वाहने जप्त

आरटीओ कार्यालयाने केलेल्या या कारवाईत ७९ वाहने जप्त करून आरटीओ कार्यालयात उभी करण्यात आली. कर, योग्यता प्रमाणपत्र नसलेल्या वाहनांबरोबर मास्क नसल्यामुळेही कारवाई करण्यात आली आहे. मास्क नसलेल्या चालकांवर एक हजार रुपयांचा दंड लावण्यात आल्याचे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल माने यांनी सांगितले.

Web Title: The RTO is now also responsible for preventing corona