औरंगाबाद : संभाव्य राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात माळी समाजाला प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी सावता परिषदेतर्फे दबावतंत्राचा अवलंब म्हणून शुक्रवारी ‘माधव’ (माळी, धनगर, वंजारी) या पॅटर्नला पुन्हा चर्चेत आणले.एका बड्या हॉटेलमध्ये सावता परिषदेच्या वतीने सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची गोलमेज परिषद झाली. त्यात मंत्रिमंडळात समाजाला स्थान देण्याची जोरदार मागणी करण्यात आली. अध्यक्षस्थानी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे तर प्रमुख पाहुणे म्हणून आ.अतुल सावे यांची उपस्थिती होती. आपणास मंत्रीपद मिळावे यासाठी समाजाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांवर दबाव आणण्यासाठीच सावे यांनी गोलमेज परिषद घडवून आणल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. कल्याण आखाडे यांनी सांगितले की, भाजीपाल्याच्या माध्यमातून सर्वांना जीवनसत्त्वे पुरविणारा माळी समाज आजही राजकीयदृष्ट्या कुपोषित आहे. या समाजाला सत्ताकारणात सुदृढ करण्यासाठी गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वच राजकीय पक्ष, संघटना विविध कार्यकारिणीवर असतात, पण माळी समाजातील लोकांना नेहमीच दुय्यम स्थान देतात. ‘सावेंना मंत्रीपद मिळावे यासाठी ही परिषद आयोजित केली होती का’, असे पत्रकारांनी विचारले असता. ‘सावे यांची मंत्रीपदासाठी वर्णी लागली तर आम्हाला आनंदच आहे’ असे उत्तर आखाडे यांनी दिले. नामदेव राऊत यांनी सांगितले की, गोपीनाथ मुंडे असताना त्यांनी ‘माधव’(माळी, धनगर, वंजारी) पॅटर्न राबविला होता. परिषदेत भास्कर अंबेकर, लक्ष्मण ढवळे, दिलीप खरात, बाळासाहेब माळी, छगन मेहत्रे, आसाराम तळेकर, मदन नवपुते, शंकर वाघमारे यांच्यासह परिषदेचे प्रतिनिधी हजर होते.
मंत्रीपदासाठी दबावतंत्राची गोलमेज परिषद
By admin | Updated: June 18, 2016 01:03 IST