बीड : शहरातील राजीव गांधी चौक ते एकनाथनगर या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू तर झाले मात्र होत असलेले काम थातूरमातूर करण्यात येत असून, या कामाची गुणवत्ता नियंत्रकाकडून तपासणी करण्याची मागणी शिवक्रांती युवा परिषदेचे संस्थापक अध्यक्ष गणेश बजगुडे यांनी केली आहे.मागील अनेक वर्षांपासून एकनाथनगर रस्त्याची दुरवस्था झाली होती. या रस्त्याचे काम रखडल्यामुळे नागरिकांना व वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. कसे तरी या रस्त्याच्या कामाला मुहूर्त लागले व काम सुरू झाले. मात्र होत असलेले रस्त्याचे काम थातूरमातूर करण्याचा प्रकार सुरू आहे. यामुळे हा रस्ता लवकरच उखडेल. डांबर व खडी टाकून दोन दिवसही झाले नाहीत तोच बारीक खडी उखडू लागली असल्याचे पहावयास मिळत आहे. होत असलेले काम थातूरमातूर होत असून, या रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेची चौकशी करण्याची मागणी शिवक्रांती युवा परिषदेच्या वतीने सोमवारी करण्यात आली आहे.एकनाथनगर येथून बसस्थानकाकडे व बाजारपेठेत येणाऱ्या लोकांची मोठी संख्या आहे. असे असतानाही या रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून मार्गी लागत नव्हते. यामुळे ज्येष्ठ नागरिकांबरोबरच पादचाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागत होता. पावसाळ्यात तर जागोजागी सखल भागात पाणी साचत होते. यावरुन परिसरातील नागरिकांनी बीड नगर पालिकेकडे रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली होती. अनेकवेळा मागणी करुनही साधे खड्डे देखील बुजले जात नव्हते. याच रस्त्याच्या दुरुस्तीला आता कसेतरी मुहूर्त लागले होते. मात्र काम दर्जेदार होत नसल्याने परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र काम सुरू असतानाच मागे पूर्णपणे खडी उखडून निघत असल्याचे चित्र एकनाथनगर मार्गावर दिसत आहे. (प्रतिनिधी)
शहरातील रस्त्याचे काम थातूरमातूर
By admin | Updated: August 19, 2014 02:12 IST