औरंगाबाद : जगातील प्रमुख तांदूळ उत्पादक देशांत तांदळाच्या कमतरतेमुळे चीन देशाने भारताकडून तांदूळ खरेदी करणे सुरू केले होते, पण मागील काही दिवसांत चीनने आयात कमी केल्याने त्याचा परिणाम भारतीय बाजारपेठेत झाला व मागील दोन दिवसांत स्थानिक बाजारात तांदळाचे भाव क्विंटलमागे २०० ते ३०० रुपयांपर्यंत कमी झाले.
नवीन तांदळाची आवक दिवाळीनंतर सुरू होते. सुरुवातीला आवक वाढल्याने भाव कमी होतात. त्यामुळे वार्षिक धान्य खरेदी करणारे डिसेंबर ते फेब्रुवारीदरम्यान तांदूळ खरेदी करून ठेवतात. मात्र, यंदा भारतीयांच्या दररोजच्या जेवणातील अविभाज्य घटक असलेला तांदूळ यंदा एवढा महागला की, सर्वजण चिंतातुर झाले होते, पण मागील आठवड्यात तांदळाचे भाव २०० ते ३०० रुपयांनी कमी झाले. तांदूळ ३००० ते ५३०० रुपये, तर बासमती तांदूळ ३२०० ते ७८०० रुपये प्रतिक्विंटल विकला जात आहे. मागील वर्षीच्या तुलनेत बिगर बासमती तांदूळ क्विंटलमागे ४०० ते ८०० रुपयांपर्यंत व बासमती तांदूळ क्विंटलमागे ३०० ते १ हजार रुपयांपर्यंत जास्त भावात विकत होता.
त्याचे कारणही तसेच होते. यासंदर्भात तांदळाच्या होलसेल व्यापाऱ्यांनी सांगितले की, भारत प्रामुख्याने बांगलादेश, नेपाळ, बेलीन आणि सेनेगलमध्ये बिगर बासमती तांदळाची निर्यात करतो, तर इराण, सौदी अरेबिया आणि इराक, आदी देशांना बासमती तांदूळ निर्यात करतो. तांदूळ उत्पादक प्रमुख देश थायलंड येथे मागील वर्षी दुष्काळामुळे तांदळाचे उत्पादन कमी झाले होते. व्हिएतनाममध्ये उत्पादन घटले. यामुळे चीन देशाने भारताकडून तांदूळ खरेदी सुरू केल्याने देशात तांदळाचे भाव गगनाला भिडले होते. यामुळे देशात २०१९ च्या आर्थिक वर्षात ९९ लाख टन तांदळाच्या निर्यातीच्या तुलनेत २०२० ते २०२१ या आर्थिक वर्षात १०४ कोटींपर्यंत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
चौकट
दररोज ३५ ते ४० टन तांदळाचा खप
औरंगाबाद शहरात दररोज ३५ ते ४० टन तांदळाची विक्री होते
नीलेश सोमाणी
होलसेल व्यापारी