औरंगाबाद : ५८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहर व जिल्ह्यातील हजारो नागरिकांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली. शुक्रवारी मध्यरात्री १२ वाजेपासून शहरातील विविध भागांतून महिला, बालगोपालांनी कँडल मार्चने जाऊन भडकलगेट परिसर हजारो दिव्यांनी उजळून टाकला. विविध वसाहतींमधून निघून भडकलगेटवर शनिवारी दिवसभर आंबेडकर अनुयायांच्या रॅली धडकत राहिल्या. विविध पक्ष, सामाजिक संघटना, मित्रमंडळे आणि कुटुंबे रात्री उशिरापर्यंत येऊन भारतीय घटनेच्या शिल्पकाराच्या चरणी नतमस्तक होत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन व पौर्णिमा असा योग शनिवारी आला होता. पौर्णिमेच्या पिठूर चांदण्यात शहराला हुडहुडी भरलेली असताना शहरवासीयांनी शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच आपल्या लाडक्या महानेत्याच्या चरणी पुष्पांजली वाहणे सुरू केले होते. जयभीमनगर, हर्षनगर, पंचशीलनगर, किलेअर्क आदी भागांतून मोठ्या संख्येने महिला, बच्चे कंपनीने कँडल मार्च काढून मध्यरात्री १२ वाजता भडकलगेटकडे कूच केले. हजारो मेणबत्त्यांच्या प्रकाशात उपासकांनी बुद्धवंदना घेऊन डॉ. बाबासाहेबांना आदरांजली वाहिली. पहाटे तीन वाजेपर्यंत कँडल मार्चचा सिलसिला सुरू होता. शनिवारी पहाटे सहा वाजेपासून पुन्हा उपासक- उपासिकांची भडकलगेटवर गर्दी उसळली. पांढऱ्या शुभ्रवस्त्रात आलेल्या या निळ्या पाखरांच्या रांगा दर्शनासाठी सायंकाळपर्यंत लागल्या होत्या. शाहीर सखुबाई साळवे यांच्या माता रमाई कला मंचच्या कलावंतांनी भीम- बुद्धगीते सादर करून प्रबोधन केले. राजकीय नेत्यांची गर्दीबाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी गर्दी केली होती. रिपब्लिकन पक्षाच्या सर्वच गटातटांसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना, मनसे आदी सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांचा यात समावेश होता. एम.आय.एम.चे आ. इम्तियाज जलील, भाजपाचे आ. अतुल सावे, सामाजिक कार्यकर्ते निकम गुरुजी, रतनकुमार पंडागळे, अॅड. रमेशभाई खंडागळे, प्रा. ऋषिकेश कांबळे, नगरसेवक कृष्णा बनकर, नगरसेवक कैलास गायकवाड, नगरसेवक मिलिंद दाभाडे, काँॅग्रेसचे जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे, शहराध्यक्ष अॅड. सय्यद अक्रम, जिल्हा परिषदेचे सभापती विनोद तांबे, मनसेचे गौतम आमराव, बसपाचे महेंद्र सोनवणे, रिपाइंचे अरविंद अवसरमल, किशोर थोरात, संजय ठोकळ आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. समता सैनिक दलाचे संचलनसमता सैनिक दलाच्या जवानांनी भडकलगेट येथे संचलन करून बाबासाहेबांना आदरांजली वाहिली. यासह दलातील जवानांनी लाठी- काठी, मुला- मुलींचे कराटे प्रात्यक्षिक सादर करून सर्वांचे लक्ष वेधले.दलाचे प्रमुख डी.व्ही. खिल्लारे, सुकदेव केदार, शेषराव हनमंते, अर्जुन भोईगड, अनिल राऊत, जी. बी. तायडे, राहुल भालेराव, रेखाताई ठोकळ, लताताई मुळे, सुरेखा साळवे यांच्या नेतृत्वाखालील तुकडीने बाबासाहेबांच्या पुतळ्यास सलामी दिली. भदन्त सुदत्त यांनी सामुदायिक बुद्धवंदना घेतल्यानंतर या जवानांनी विविध प्रात्यक्षिके सादर केली. नेत्यांनो एक व्हा...यशोधरा कॉलनी, वैशालीनगर, हर्षनगर, अशोकनगर- शहाबाजार, पंचशीलनगर, किलेअर्क वसाहतीतील नागरिकांनी सुंदर चित्ररथातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढून भडकलगेट गाठले. जवखेडा हत्याकांडाची सीबीआय चौकशी करा, दर रविवारी विहारात जा, खैरलांजी ते जवखेडा टाळण्यासाठी दलित नेत्यांनो आता तरी एक व्हा, महाबोधी विहार मुक्त करा आदी घोषणांचे फलक झळकावीत या रॅलीत शेकडो महिला, पुरुष, बालके सहभागी झाली होती. भावसिंगपुरा येथील साकेत बुद्धविहार समितीने मोटारसायकल रॅली काढून अभिवादन केले. दिवसभरात विविध वसाहतींमधून लहान- मोठ्या अनेक रॅली आल्या. शहरातील बुद्धविहारे, सामाजिक सभागृहांतून सामुदायिक बुद्धवंदना, प्रवचने आयोजित केली होती. विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासही अनेकांनी जाऊन अभिवादन केले.
बाबासाहेबांना आदरांजली
By admin | Updated: December 7, 2014 00:19 IST