उस्मानाबाद : जिल्हा परिषद शिक्षण विभागातील शिक्षकांचे रोस्टर २००३ पासून अद्ययावत करण्यात आलेले नव्हते. निमशिक्षकांच्या नियुक्तीच्या अनुषंगाने हा मुद्दा समोर आल्यानंतर बिंदू नामावली (रोस्टर) अद्ययावत करण्यात आली आहे. त्यानुसार वेगवेगळ्या आरक्षणाच्या प्रवर्गातील सुमारे ७७८ जागांचा अनुशेष शिल्लक आहे. तर दुसरीकडे खुल्या प्रवर्गातील तब्बल ३०६ शिक्षक अतिरिक्त असल्याचे समोर आले आहे. मागील काही वर्षांपासून शिक्षक भरती प्रक्रिया बंद आहे. भविष्यात भरती निघाली तरी खुल्या प्रवर्गातील शिक्षकांची भरती करता येणार नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाअंतर्गत शिक्षकांची ५ हजार १२९ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ४ हजार ६५७ पदे भरलेली आहेत. तर ४७२ पदे रिक्त आहेत. शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या २९ मार्च १९९७ च्या निर्णयानुसार यापैकी २ हजार ४६१ पदे ही खुल्या प्रवर्गासाठी तर २ हजार ६६८ पदे आरक्षणातून भरणे बंधनकारक होते. परंतु, कार्यरत शिक्षक आणि मुख्याध्यापक यांची बिंदू नामावली २००३ पासून अद्ययावत करण्यात आलेली नाही. त्यामुळे जिल्हा परिषद शिक्षण विभागाअंतर्गत कोणत्या प्रवर्गातील नेमके किती शिक्षक कार्यरत आहेत? याचा थांगपत्ता लागत नव्हता. मध्यंतरीच्या काळात शिक्षकांची भरती प्रक्रिया सर सेवा पद्धतीने शासनाच्या आरक्षणाच्या कोट्यानुसार राबविण्यात आली. त्यामुळे ही प्रक्रिया राबविताना जिल्ह्यातील आरक्षित पदसंख्येचा विचार कुठेच झाला नाही. या सर्व प्रकारामुळे आरक्षित प्रवर्गातील शिक्षकांचे किती बिंदू शिल्लक आहेत, खुल्या प्रवर्गातील बिंदूची काय अवस्था आहे? याचा मागमूस लागत नव्हता. दरम्यान, दोन-अडीच वर्षापूर्वी ८३ निमशिक्षकांना नियुक्ती देण्यात आली होती. साधारणपणे वर्षभरापूर्वी संबंधित निमशिक्षकांना शिक्षण विभागाने सेवेतून कमी केले. त्यानंतर हा प्रश्न अधिक जटील बनला. याचवेळी बिंदू नामावलीचा मुद्दाही समोर आला. तेव्हापासूनच बिंदू नामावली अद्ययावत करून घेण्यासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्न सुरू झाले. यासाठी शिक्षण विभागाकडून अभ्यासू कर्मचाऱ्यांची टीम तयार करण्यात आली होती. या टिमने युद्धपातळीवर हे काम पूर्ण करून शिक्षकांची कुंडली विभागीय आयुक्त कार्यालयाकडे तपासणीसाठी पाठविली होती. या कार्यालयाकडूनही अनेकवेळा त्रुटी काढल्या गेल्या. त्या-त्या वेळी शिक्षण विभागाने त्रुटींची पूर्तता केली. आणि त्यानंतर कुठे विभागीय आयुक्त कार्यालयाने आरक्षित पदी नियुक्त मागासवर्ग कर्मचाऱ्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीच्या अधीन राहून बिंदू नामावली अद्ययावत करून दिली. त्यानुसार आरक्षित प्रवर्गातील ७७८ जागांचा अनुशेष शिल्लक असल्याची बाब समोर आली आहे. तर खुल्या प्रवर्गातील ३०६ शिक्षक अधिक आहेत. तब्बल तेरा वर्षानंतर रोस्टर अद्ययावत झाल्यामुळे आता आरक्षणानुसारच भविष्यात शिक्षकांची भरती केली जाणार आहे. बदल्यांसाठीही हीच माहिती उपयोगात आणली जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. प्रमाणपत्र पडताळणीच्या अधीन राहून दिली मंजुरीआरक्षित पदी नियुक्त मागासवर्ग कर्मचाऱ्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीच्या अधीन राहून विभागीय आयुक्त कार्यालयाकडून शिक्षण विभागाचे रोस्टर तपासून मंजुरी देण्यात आली. हे प्रमाणपत्र पडताळणी करून घेण्याची जबाबदारी नियुक्ती प्राधिकारी, नियंत्रण अधिकारी व अस्थापना अधिकाऱ्यांची राहिल, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.(प्रतिनिधी)
गुरुजींच्या ७७८ पदांचा आरक्षण अनुशेष शिल्लक
By admin | Updated: March 18, 2017 23:42 IST