छत्रपती संभाजीनगर : सिडको चौक ते हर्सूल टी पॉइंट रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे. यातील देवगिरी बँक ते आंबेडकर चौकादरम्यानच्या काँक्रिटीकरणामुळे सिडको बसस्थानकाकडून हर्सूलकडे जाणारी वाहतूक सर्व्हिस रोडवर वळविण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे.
महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळातर्फे जळगाव रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. याचदरम्यान आंबेडकर चौक ते गरवारे कंपनीपर्यंत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. यादरम्यान वाहतूक सुरळीत ठेवण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. संपूर्ण जळगाव रोडच्या दुरुस्तीसाठी साधारण तीन वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. वाहतूक पोलिसांनी यासाठी त्यांना भाग ठरवून देत सर्व्हिस रोड, दुभाजकांच्या वळणानुसार टप्पे पाडून दिले आहेत.
समजून घ्या, कसा असेल बदल-देवगिरी बँक (वोक्हार्ट कंपनी चौक) ते एन-७ येथील रिलायन्स पेट्रोलपंपापर्यंत काँक्रिटीकरण सुरू झाले आहे. यादरम्यान सिडको बसस्थानक ते हर्सूलच्या दिशेने जाणारी वाहने याच दिशेच्या सर्व्हिस रोडने आंबेडकर चौकापर्यंत जातील. तेथून मुळ रस्त्यावर वळतील.-साधारण दहा दिवस जलवाहिनीचे काम चालेल. यादरम्यान हर्सूलकडून सिडको बसस्थानकाकडे जाणारी वाहने आंबेडकर चौकातून मुख्य रस्त्यावरूनच विरुद्ध दिशेने रिलायन्स पेट्रोलपंपापर्यंत जाऊन तेथून मूळ रस्त्यावर (गरवारे कंपनीच्या दिशेने) वळतील. जलवाहिनीच्या कामानंतर त्या बाजूची वाहने नियमित धावतील.
आठ टप्प्यांत बदलसिडको चौक ते हर्सूल टी पॉइंट असा दोन्ही बाजूच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम चालेल. वाहतूक पोलिसांच्या सूचनेनंतर साधारण ८ टप्प्यांमध्ये याचे काम होईल. सुरुवातीला सिडको ते हर्सूल या बाजूचे संपूर्ण काम करण्याची सूचनाही वाहतूक पोलिसांनी केली आहे. सर्व्हिस रोडवर कंपनीच्या बस, रहिवाशांच्या गाड्या उभ्या न करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.