लोकमत न्यूज नेटवर्कबीड : मागील २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्यानंतर सोमवारी दिवसभरात जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस बरसला होता. मंगळवारी दिवसभरात मात्र पावसाने जोरदार आगमन केले. यामुळे पाण्याअभावी माना टाकणाऱ्या कोवळ्या पिकांना दिलासा मिळाला आहे. या दमदार पावसामुळे दुबार पेरणीचे संकट टळल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे.जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली होती. याच पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी उरकली होती. पिके उगवण्याइतपत पाऊस झाल्याने शेतकरी समाधानी होता. परंतु त्यानंतर पावसाने दडी मारल्याने कोवळी पिके सुकू लागली होती. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. सर्वांच्या नजरा आभाळाकडे लागल्या होत्या. रोज दिवसभर ढगाळ वातावरण राहायचे आणि रात्रीच्यावेळी चांदणे दिसायचे. यामुळे दिवसेंदिवस पिकांबद्दल शेतकऱ्यांची चिंता वाढतच गेली. अशा परिस्थितीतही काही शेतकऱ्यांनी खते जमिनीत टाकली. मजूरीवरही हजारोंचा खर्च केला. परंतु पाऊस नसल्याने चिंता लागली होती. अखेर सोमवारी काही भागात पावसाने हजेरी लावल्याने दिलासा मिळाला होता. मंगळवारी पुन्हा पावसाने जिल्ह्यात ठिकठिकाणी हजेरी लावली.
जिल्ह्यात रिमझिम; पिकांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:51 IST