सोयगाव : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत तालुक्यात ऑक्सिजन आणि रेमडेसिविरची मागणी वाढली असून, ते उपलब्ध होत नसल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. चिंता ग्रासली असून, ऑक्सिजनसाठी जरंडी आणि निंबायती कोविड केंद्रातून ७० रुग्ण घाटीत तर रेमडेसिविर न मिळाल्याने ५० रुग्णांना जळगाव जिल्ह्यातील खासगी रुग्णालयात रेफर करावे लागले.
राज्य शासनाच्या नियमानुसार प्रत्येक जिल्ह्याला रेमडेसिविर इंजेक्शन व ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे. त्यात सोयगाव तालुक्याला रेमडेसिविर इंजेक्शन न मिळाल्याने प्रकृती अस्थिर असलेल्या रुग्णांच्या उपचारात अडचणी निर्माण होत आहेत. तालुक्यात ऑक्सिजनयुक्त बेड उपलब्ध नाही. जरंडी आणि निंबायती दोन्ही कोविड केंद्र ऑक्सिजनविरहित आहेत. गंभीर रुग्णांना औरंगाबाद शासकीय रुग्णालयात हलविले जात आहे. रेमडेसिविरसाठी खासगी रुग्णालयात बाधित रुग्णांना दाखल व्हावे लागत आहे.
जळगाव जिल्ह्यात खासगी रुग्णालयात रेमडेसिविरसाठी आयसीयूमध्ये पन्नासच्या वर रुग्ण दाखल झालेले आहेत. परंतु जळगाव जिल्हाधिकारी यांच्याकडे उपलब्ध असलेला रेमडेसिविरचा साठा जळगाव जिल्ह्यासाठीच उपलब्ध असल्याने सोयगाव तालुक्यातून दाखल झालेल्या रुग्णांना सोयगाव तालुक्याचे आधार कार्ड संबंधित खासगी डॉक्टरने अपलोड केल्यास सोयगाव तालुक्याच्या रुग्णासाठी रेमडेसिविरसाठी नो एन्ट्री असा संदेश जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षातून मिळत आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात उपचारासाठी दाखल होऊनही सोयगाव तालुक्यातील रुग्णांना रेमडेसिविर मिळत नसल्याने चिंतेची बाब निर्माण झाली आहे.