छत्रपती संभाजीनगर : ट्रकच्या कर्जाची संपूर्ण परतफेड करूनही बेबाकी प्रमाणपत्र (एनओसी) देत नसल्याने संतप्त मोहम्मद जाहूर शेख (४७, मूळ रा. मुरूमखेडा ह.मु. करमाड) यांनी फायनान्सच्या कार्यालयातच विष प्राशन केले. सायंकाळी त्यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. गुरुवारी (दि.२) दुपारी ४ वाजता ही घटना घडली.
जाहूर यांनी २०१८ मध्ये खाजगी फायनान्स कंपनीकडून ट्रकसाठी २१ लाख १२ हजार रुपये कर्ज घेतले होते. त्यावर त्यांना ५९ हजार रुपये महिन्याला व्याज होते. दोन वर्षांपूर्वी त्यांनी सेव्हन हिल येथील फायनान्स कंपनीत कर्ज ट्रान्सफर केले होते. काही महिन्यांपूर्वी त्यांनी सर्व कर्ज व्याजासह फेडल्याने त्यांना एनओसी सर्टिफिकेट पाहिजे होते. चाळीस दिवसांपासून सतत ते कंपनीच्या कार्यालयात त्यासाठी चकरा मारत होते. कुटुंबाच्या आरोपानुसार, कंपनीचे अधिकारी मात्र कर्ज परतफेड केल्यानंतरही ‘एनओसी’ देण्यास टाळाटाळ करत होते. त्यामुळे मोहम्मद यांनी २ जानेवारी रोजी दुपारी कंपनीत जात सोबत नेलेले विष प्राशन करून आत्महत्या केली.
रुग्णालयात दाखल केले नाहीनातेवाइकांच्या आरोपानुसार, जाहूर यांनी विष प्राशन केल्यानंतर ते कार्यालयातच कोसळले. तेथे त्यांचा रात्री उशिरापर्यंत बूट पडलेला होता. पडल्यानंतर बँकेने त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची तसदीदेखील घेतली नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. परिणामी, दाखल करण्यास उशीर झाल्याने त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. रात्री पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे अधिकारी कार्यालयात दाखल झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, ३ मुले, सून, नातू, असा परिवार आहे. रात्री उशिरापर्यंत नातेवाईक सीसीटीव्ही फुटेजची मागणी करीत कार्यालयात ठाण मांडून होते.