शहरं
Join us  
Trending Stories
1
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
2
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
3
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
4
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
5
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
6
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
7
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
8
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
9
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
10
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
11
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
12
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
13
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
14
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
15
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
16
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
17
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
18
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
19
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
20
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू

मुलखावेगळी आई साकारताना...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2021 4:02 AM

आपल्याकडे स्त्रियांवर असलेली सामाजिक, कौटुंबिक बंधनं आणि निसर्गत: तिच्यावर असलेली शारीरिक बंधनं, मातृत्वाची जबाबदारी यामुळे अगदी विसाव्या शतकात पाऊल ...

आपल्याकडे स्त्रियांवर असलेली सामाजिक, कौटुंबिक बंधनं आणि निसर्गत: तिच्यावर असलेली शारीरिक बंधनं, मातृत्वाची जबाबदारी यामुळे अगदी विसाव्या शतकात पाऊल टाकेपर्यंत विशेष कर्तृत्व गाजवलेल्या महिलांची संख्या अगदी मर्यादित होती, हे मान्य करायला हवं. विसाव्या शतकापासून स्त्रियांच्या कर्तृत्वाला वाव मिळत गेला आणि त्यांना त्यांचं कर्तृत्व सिद्ध करायची संधी मिळू लागली, जिचा त्यांनी पुरेपूर फायदा घेत अनेक क्षेत्रांत आकाशाला गवसणी घातल्याचं आज आपल्याला पाहायला मिळतं.

बाईपण आणि आईपण हे एकाअर्थी हातात हात घालून चालतं. आईपणाच्या अनेक व्याख्या आपण ऐकलेल्या आहेत. आई होणं सोपं नसतं, मुलांना वाढवणं ही जगातली सगळ्यांत कठीण बाब आहे, इथंपासून ते आईची थोरवी गाणारी अनेक प्रसिद्ध वचनं आपल्याला माहिती आहेत. मी स्वत: दोन मुलांची आई असल्यानं त्यातल्या खऱ्या-खोट्या बाबी मी स्वत:सुद्धा अनुभवल्या आहेत. पण सुदैवानं माझं आई असणं फक्त तेवढंच राहिलं नाही. मी अभिनेत्री असल्यानं मला एकाच जन्मात अनेक वेळा आई होता आलं. ‘ध्यानीमनी’ नाटकातली जगावेगळी आई, ‘आई’ चित्रपटातली डोळस आई किंवा महात्मा गांधी आणि हरीलाल या दोघांमध्ये अडकलेली कस्तुरबांमधली आई आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. पण सध्या मी एक अशी आई साकारतेय, एक अशी स्त्री रंगवतेय, जिची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही आणि ती आई म्हणजे अवघ्या मराठी मुलखाची आई... जिजाऊ माँसाहेब. सोनी मराठीवर स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेत जिजाऊंची भूमिका करणार का, अशी मला विचारणा झाली आणि मी अक्षरश: हरखून गेले. आजवर आपण पाहिलेल्या, ऐकलेल्या, वाचलेल्या व्यक्तिरेखांपैकी आदर्श माता म्हणजे जिजाऊ. महाराजांच्या मनात स्वराज्याच्या स्वप्नाचं बीज ज्यांनी पेरलं, त्या जिजाऊ. पण मी जिजाऊ साकारायला लागेपर्यंत मीही एवढंच मानत आले होते, की जिजाऊंनी महाराजांना एक राजा म्हणून घडवलं, त्यांच्यावर संस्कार केले, त्यांना उत्तमोत्तम शिक्षण दिलं आणि मग त्यातून महाराज घडले.

आणि मग माझी भेट सतराव्या शतकातल्या एका अशा स्त्रीशी झाली, जिनं मला पार झपाटून टाकलं. ती स्त्री म्हणजे जिजाऊ माँसाहेब. जिजाऊंमधली आई ही केवळ राजेंची आई नसून, अवघ्या रयतेची माउली होती हेही माहीत होतं. पण त्या स्वराज्य-संकल्पनेच्याही जननी होत्या, हे आता जिजाऊ साकारताना लक्षात येतंय. आपल्या पतीबरोबर त्यांनी एक असं स्वप्न पाहिलं, जे साडेतीनशे वर्षांपूर्वी कल्पनेच्याही पलीकडचं होतं. त्यासाठी लागणारी आर्थिक, मानसिक कोणतीच तयारी तेव्हा नव्हती. पण त्यांनी स्वप्न पाहिलं आणि त्या दिशेनं वाटचालही सुरू केली. शहाजीराजेंच्या अनुपस्थितीतही जिजाऊंनी आपल्या मुलाला ज्या आत्मबळानं, चातुर्यानं आणि मुत्सद्दीपणानं छत्रपती होण्यापर्यंतचा मार्ग दाखवला, त्याला तोड नाही. महाराज मोहिमांवर असताना जिजाऊंनी स्वराज्याच्या प्रशासनाचा तंबू एकहाती सांभाळला. इतकंच नाही, तर महाराजांच्या अनुपस्थितीत प्रसंगी चोख रणनीती आखून शत्रूला परास्तही केलं.

नुकताच आम्ही मालिकेत अफजलखान वधाचा प्रसंग चितारला. “खानाला जिवंत सोडू नका”, हे शिवबांना सांगताना अंगावर जे शहारे आले, ते मी आजन्म विसरू शकणार नाही. राजे पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकलेले असताना मोठमोठे सरदार वेढा फोडण्यात यशस्वी होईनात, तेव्हा “राजेंच्या सुटकेसाठी आम्ही जातो”, असं म्हणणाऱ्या जिजाऊंच्या अंगात त्यावेळी काय संचारलं असेल, या कल्पनेनंच शहारायला होतं. एकमेव जिवंत असलेला मुलगा आणि एकुलता एक नातू आग्ऱ्याला औरंगजेबासारख्या बलाढ्य शत्रूच्या कैदेत असताना, शांत राहून पुढची नीती आखत असताना त्या माऊलीच्या मनात काय खळबळ माजली असेल, या विचारानंच मती कुंठीत होते.

अतिशय शांत, समजूतदार आई, आजी, सासू आणि त्याचवेळी अतिशय चाणाक्ष आणि दूरदर्शी प्रशासक अशा अनेक भूमिका त्यांनी एकाचवेळी साकारल्या. ते सहज झालं नसणार. त्यांनी हे सगळं अगदी लीलया पेललं असं म्हटलं, तर त्यांच्या संघर्षाचं मोल आपण कमी करू. जिजाऊंनी अक्षरश: शून्यातून स्वर्ग साकारला. असा स्वर्ग, जिथं तिचं प्रत्येक लेकरू सुखानं-समाधानानं नांदू शकत होतं. शौर्य, धैर्य, मुत्सद्दीपणा यांचं मूर्तिमंत रूप म्हणजे जिजाऊ माँसाहेब! साठीनंतरही राजगडावर असताना एखाद्या तरुणीला लाजवेल अशा उत्साहात गड चढ-उतार करणाऱ्या या महान स्त्रीला काय म्हणावं कळत नाही. कर्तृत्ववान या शब्दालाही ठेंगणं ठरवेल, असं जिजाऊंचं व्यक्तिमत्त्व चित्रीकरण करताना रोज माझ्यासाठी बाहू पसरून उभं असतं. त्यांच्या एकेका शब्दातून घेण्याजोगं इतकं आहे की, रोजचं चित्रीकरण संपत असताना, ‘दुबळी माझी झोळी’ हाच विचार मनात असतो. जिजाऊ दररोज माझ्यातल्या आईला आणि बाईला असंख्य पेच टाकतात आणि तितकीच उत्तरं आणि गुपितंही मला सांगत राहतात. खरं तर कोविडच्या वातावरणात या वयात शूटिंगसाठी बाहेर जाण्याचा धोका पत्करावा की नाही, अशी शंका मालिका स्वीकारण्याआधी एक क्षण मनाला चाटून गेली होती. पण या मालिकेमुळे मला ज्या अद्भुत स्त्रीची, एका मुलखावेगळ्या आईची भेट घडवून दिली, त्यासाठी आज मी देवाचे आभार मानते.

आजच्या प्रत्येक आईनं जिजाऊंना आदर्श म्हणून समोर ठेवलं, तर उद्या प्रत्येक घरात महाराजांसारखी मुलं निपजतील यात शंका नाही. किंबहुना ज्या माऊली आपल्या लेकरांना देशासाठी अर्पण करून सीमेवर लढायला पाठवतात, त्या माउलींमध्ये जिजाऊंचाच अंश असणार, असं वाटतं. ज्या मातीत जिजाऊंनी शौर्य पेरलं, त्या मातीत देशप्रेमाचं पीक उगवतं, यात नवल ते काय? म्हणूनच आजच्या दिवशी आपलं स्त्री असणं ही मर्यादा न मानता, जगाचा उद्धार करण्यासाठी सगळ्या पोरी-बाळींसाठी मार्गदर्शक ठरणाऱ्या जिजाऊ माँसाहेबांपुढे नतमस्तक होण्यावाचून राहवत नाही.

- नीना कुळकर्णी