छत्रपती संभाजीनगर : अवघ्या ५ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करणारा आरोपी शेख फैजान शेख साबेर (२३) याला ‘पोक्सो’च्या विशेष न्यायाधीश ए. एस. वैरागडे यांनी २० वर्षे सक्तमजुरी आणि ५० हजार रुपये दंड ठोठावला.
पीडितेच्या कुटुंबाला शासकीय नियमांनुसार नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करण्याचे आदेश न्यायालयाने जिल्हा विधि सेवा प्राधिकरणास दिले आहेत.
काय होती घटना ?साडेपाच वर्षांच्या बालिकेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार १८ ऑगस्ट २०२१ रोजी ती सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास अरबी भाषा शिकण्यासाठी गेली आणि ९:३० वाजण्याच्या सुमारास रडत घरी आली. तिच्या आईने रडण्याचे कारण विचारले असताना ‘आई बोलावत असल्याचे खोटे सांग़ून आरोपीने शाळेत नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे सांगितले. पीडितेचे आई वडील आरोपीला जाब विचारण्यासाठी त्याच्या घरी गेले असता लोक जमा झाल्याचे पाहून आरोपी तेथून पळून गेला. याबाबत अजिंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
खटल्याची सुनावणी व शिक्षातत्कालीन पोलिस उपअधीक्षक विजयकुमार मराठे यांनी तपासाअंती दोषारोपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीवेळी अतिरिक्त सरकारी लोकाभियोक्ता (गृह) आशिष दळे यांनी २० साक्षीदारांचे जबाब नोंदविले. त्यापैकी पीडिता, डॉक्टर, शाळेचे मुख्याध्यापक आणि न्याय वैद्यक प्रयोगशाळेचे तज्ज्ञ यांचे जबाब महत्त्वाचे ठरले. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपी शेख फैजान याला दोषी ठरवून पोक्सोच्या कलम ६ अन्वये वरीलप्रमाणे शिक्षा व दंड ठोठावला. दंड न भरल्यास आरोपीला ३ महिन्यांचा अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असे आदेशात म्हटले आहे.