औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर एक महिन्यापूर्वी लेखी दिलेले आश्वासन न पाळल्यामुळे संतप्त झालेले खा. चंद्रकांत खैरे यांनी मंगळवारी कुलगुरूडॉ. बी. ए. चोपडे यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. विद्यापीठ रोजंदारी कर्मचाऱ्यांनी आॅगस्ट महिन्यात आपल्या मागण्यांसाठी उपोषण केले होते. त्यावेळी खा. खैरे यांच्या मध्यस्थीने उपोषण सोडण्यात आले होते. त्यावेळी कुलगुरूआणि प्रभारी कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे यांनी किमान वेतन कायद्याप्रमाणे रोजंदारी कर्मचाऱ्यांचे वेतन करण्याचे तसेच रोजंदारी कामगारांची विभागनिहाय ज्येष्ठता यादी तयार करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. ही कामे एक महिन्याच्या आत केली जातील, असे सांगण्यात आले होते. मात्र महिनाभरात काहीच हालचाल न झाल्याने मंगळवारी खा. खैरे, नगरसेवक नंदकुमार घोडेले, डॉ. कैलास पाथ्रीकर, पर्वत कासुरे, पूनमचंद सलामपुरे, भाविसेचे विद्यापीठ प्रमुख तुकाराम सराफ, हिरा सलामपुरे आदी मंडळी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास कुुलगुरूंच्या कक्षात आली. त्यांच्यासमवेत भविष्य निर्वाह निधीचे तसेच कामगार उपायुक्त कार्यालयाचे अधिकारीही होते. यावेळी खा. खैरे यांनी प्रश्नांची सरबत्ती केल्याने कुलगुरूआणि प्रभारी कुलसचिवांची भंबेरी उडाली.
रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर कुलगुरुंची भंबेरी
By admin | Updated: September 28, 2016 00:41 IST