हिंगोली : काही दिवसांवर खरेदी राहिल्यामुळे शनिवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कॉटन मार्केटमध्ये कापसाची विक्रमी आवक झाली. वर्षभर सरासरी १ हजार क्विंटलच्या घरातच होणार्या आवकनेशनिवारी दिड हजार क्विंटलाचा टप्पा ओलांडला. उत्पादकांना बर्यापैकी भाव मिळल्याने कमाल दर ५ हजार १०० रूपयांवर गेला. दोनदा तारीख वाढविल्यामुळे बाजार समितीत कापसाची खरेदी होत आहे. २५ मे ही खरेदीची अंतिम तारीख दिल्याने शनिवार खरेदीचा शेवटचा दिवस म्हणावा लागेल. कारण रविवारी बाजार समितीला सुट्टी असल्याने लिलाव होणार नाही. म्हणून शनिवारी उत्पादकांनी मोठ्या प्रमाणात कापूस विक्रीसाठी आणला होता. कॉटन मार्केटमध्ये कापूस घेवून आलेल्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मोजक्याच व्यापार्यांकडून सकाळी लिलावास सुरूवात करण्यात आली. नेहमीपेक्षा ५०० रूपयांच्या कमी दराने लिलावास सुरूवात झाली. पाऊणे पाच ते पाच हजार रूपयांपासून होणारी खरेदी शनिवारी ४ हजार २५० रूपयांपासून सुरू झाली. दरम्यान, लिलाव वाढत जावून उत्पादकांना ५ हजार १०० रूपयांचा कमाल दर मिळाला. तसेच दिवसभरात १ हजार ६३० क्विंटल कापसाची खरेदी खासगी व्यापार्यांनी केली. मागील वर्षी कापसाचे क्षेत्र अधिक असूनही लवकर खरेदी आटोपली होती. यंदा कमी क्षेत्र असून खरेदीची तारीख लांबत राहिली. भाववाढीची अपेक्षा ठेवल्याने उत्पादकांनी कापूस घरीच दाबून ठेवला होता; परंतु भाव स्थिर राहिल्याने कापूस ठेवूनही शेतकर्यांचा फायदा झालेला नाही. उलट खरेदी तारीख वाढत राहिली. (प्रतिनिधी)
हिंगोलीत दीड हजार क्विंटल कापसाची खरेदी
By admin | Updated: May 25, 2014 01:13 IST