कडा : दुष्काळीे परिस्थितीवर मात करुन डाळींबाच्या बागांना शेतकऱ्यांनी टँकरने पाणी पुरवठा केला आहे. डाळींबाच्या बागेवर वारेमाप खर्च केलेला आहे. असे असताना अचानक डाळींबाचे भाव घसरल्याने डाळींब उत्पादक अडचणीत आले आहेत. आष्टी तालुक्यात १२०० हेक्टरच्या जवळपास डाळींबाची लागवड करण्यात आलेली आहे. तालुक्यात मागील तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती असल्याने पाण्याची प्रचंड टंचाई आहे. मात्र काही शेतकऱ्यांनी टँकरने डाळींबाला पाणी देऊन झाडे जोपासली आहेत. त्या झाडांना फळेही चांगली लागलेली आहेत. डाळींब तोडण्यासाठी आलेले असतानाच अचानक डाळींबाचे भाव निम्म्याने घसरले आहेत. यामुळे डाळींब उत्पादक शेतकऱ्यांच्या आशेवरच पाणी फेरले आहे. एक तर मागील तीन वर्षांपासूनच्या दुष्काळाने आष्टी, शिरूरकासार, पाटोदा तालुक्यातील शेतकरी त्रस्त झाला आहे. इतर नगदी पिकांची पुरती वाताहत झाली असल्याने शेतकरी फळ शेतीकडे वळला आहे. यामध्येही ऐनवेळी फळांना भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. आष्टी तालुक्यातील १२०० हेक्टरवरील डाळींब उत्पादकांना भाव घसरल्याचा फटका बसला आहे. आठ दिवसांपूर्वी ६० ते ७० रुपये किलो जागेवरून विकले जाणारे डाळींब आता ३० ते ३५ रुपये किलोने द्यावे लागत असल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले. नाशिक, पंढरपूर, पुणे व सातारा या भागातील डाळींब मोठ्या प्रमाणात बाजारात येत असल्याने अचानक डाळींबाचे भाव गडगडले असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. एवढेच नाही तर पंढरपूर, मुंबई, वाशी व पुणे येथील डाळींब चांगल्या प्रतीचे आहे. यामुळे डाळींबावर मोठ्या प्रमाणावर तेज असल्याने येथील डाळींबांना जास्त मागणी आहे. आष्टी तालुक्यातील डाळींबावर तेल्या रोगामुळे डाळींबाचा दर्जा खालावला असल्याचा परिणाम चांगला भाव मिळत नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. (वार्ताहर)