छत्रपती संभाजीनगर: शहरातील शैक्षणिक संस्थांच्या परिसरात महागड्या स्पोर्ट बाईकवर येत मोठ्याने हॉर्न वाजवत मुलींना त्रास देऊन धिंगाणा घालणाऱ्या टवाळखोरांवर आता पोलिसांनी कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. सिडको येथील एमजीएम कॉलेज परिसरात मुलींना त्रास देणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर आयटी ऍक्ट आणि विनयभंगासह तब्बल १४ गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच महागडी बीएमडब्ल्यू बाईक देखील पोलिसांनी जप्त केली आहे.
१० सप्टेंबर रोजी सिडको पोलीस ठाण्यात महिला पोलीस हवालदार कल्पना राघोजी खरात यांनी तक्रार दाखल केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता त्या दामिनी पथकासह एमजीएम कॉलेज परिसरात पेट्रोलिंग करत होत्या. त्यावेळी काही कॉलेज विद्यार्थिनींनी त्यांच्याशी संपर्क साधून दोन मुलांच्या कृत्याबद्दल माहिती दिली. आरोपी हे विना क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या बीएमडब्ल्यू स्पोर्ट्स बाईकवर कर्कश आवाज करून, फटाक्या सारखा हॉर्न वाजवून ध्वनी प्रदूषण करत होते. तसेच ते मुलींसमोर वेडी-वाकडी बाईक चालवून त्यांना घाबरवत होते आणि काही मुलींचा पाठलाग करत होते. आरोपी अश्लील हावभाव करत मुलींचे गुप्तपणे व्हिडिओ काढून ते इंस्टाग्रामवर व्हायरल करत असल्याची माहितीही विद्यार्थिनींनी दिली.
पोलिसांची गोपनीय चौकशीया तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी गोपनीय पद्धतीने तपास सुरू केला. आरोपीच्या दहशतीमुळे कोणीही समोर येऊन तक्रार देण्यासाठी तयार नव्हते, तरीही पोलिसांनी तपास सुरू ठेवला. चौकशीअंती पोलिसांनी शेख समीर शेख सलीम आणि सय्यद ईजाज सय्यद मुख्तार अशी दोन आरोपींची नावे निष्पन्न केली. यापैकी शेख समीर हा बाईक चालवत होता आणि सय्यद ईजाज हा व्हिडिओ बनवत होता, असे तपासात समोर आले आहे. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या सूचनेवरून, सहायक निरीक्षक विवेक जाधव यांनी केली आहे. पुढील तपास पो.नि कुंदनकुमार वाघमारे हे करत आहेत.
कठोर कलमांखाली गुन्हा दाखल, महागडी बाईक जप्तया प्रकरणी आरोपींवर आयटी ऍक्ट आणि विनयभंगासह तब्बल १४ गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल आहे. यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ७४, ७८, २८१, २९२, ३५२ सह मोटरवाहन अधिनियम, पर्यावरण संरक्षण अधिनियम आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००५ च्या विविध कलमांचा समावेश आहे. पोलिसांनी आरोपीची महागडी स्पोर्ट्स बाईकही जप्त केली आहे.
टवाळखोरांवर होणार कठोर कारवाईपोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी सांगितले की, उस्मानपुरा, निराला बाजार, औरंगपुरा, एमजीएम परिसर आणि इतर महाविद्यालयांच्या आवारात दुचाकींचा कर्कश आवाज करून धिंगाणा घालणाऱ्या टवाळखोरांवर यापुढे अशीच कठोर कारवाई केली जाईल. सोशल मीडियावरही विशेष लक्ष ठेवले जाईल