छत्रपती संभाजीनगर : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात मेसचा डबा न घेतल्यामुळे विद्यार्थिनींना महिन्याला ३०० रुपयांचा दंड लावला. परीक्षा संपल्यानंतर घरी जाणाऱ्या काही विद्यार्थिनींनी एकूण ९०० रुपये दंड न भरल्यामुळे गेटवर अडवण्यात आल्यामुळे एकच गोंधळ उडाल्याचा प्रकार रविवारी दुपारी घडला.
मातोश्री शासकीय वसतिगृहात ४०० हून अधिक विद्यार्थिनी राहतात. येथे खासगी एजन्सीमार्फत खानावळ चालवली जाते. एका महिन्याचा डबा घेण्यासाठी १,८०० रुपये आकारतात. मात्र, डब्यात केस, काचा, अळ्या आढळल्याने काही विद्यार्थिनींनी मेस बंद केली. त्यानंतर मेसचालकाने डबा न घेणाऱ्यांना महिन्याला ३०० रुपये दंड लावला.
शनिवारी सकाळी वसतिगृहाच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर वॉर्डनने दंड भरण्याचा मेसेज पाठवला. परीक्षा संपल्यानंतर काही विद्यार्थिनी घरी निघाल्या. मात्र, गेटवर त्यांना अडवले. ‘दंड भरल्याशिवाय बाहेर जाता येणार नाही,’ असं सांगण्यात आलं. विद्यार्थिनींनी त्याला विरोध केला. ‘डबा घेतलाच नाही, मग पैसे का द्यायचे?’ असा सवाल केला. त्यावर ‘महाविद्यालयाचा नियम आहे,’ असे सांगण्यात आले.
या प्रकाराची माहिती एका विद्यार्थिनीने पालकांना दिली. तिचे वडील शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी ही माहिती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिली. जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ वसतिगृहात पोहोचले. पोलिस निरीक्षक अतुल येरमेही घटनास्थळी आले. त्यानंतर महाविद्यालय प्रशासनाने नमते घेत मेसचालकाला दंड वसूल न करण्याचे आदेश दिले. त्यानंतर विद्यार्थिनींना घरी जाण्याची परवानगी मिळाली.