संजय जाधव, पैठणनिवडणुकीत कोण कशाचा आणि कसा वापर करील याचा नेम नाही. वापरलेल्या नानाविध फंड्यांपैकीच काही यशस्वी होतात, तर ते कधी अंगलटही येण्याची शक्यता नाकारता येत नाही. पैठण मतदारसंघात एका उमेदवाराने असा अफलातून फंडा वापरला; मात्र तो फंडा उघड झाल्याने उमेदवाराची नाहक फजिती झाली. हा सगळा खटाटोप त्या उमेदवाराचाच आहे हे समजल्यावर त्याचे पितळ उघडे पडले.त्याचे झाले असे, एका धनदांडग्या उमेदवाराने भविष्य सांगणारे ज्योतिषी रोजाने लावले. हे ज्योतिषी गावागावात फिरून हाच उमेदवार निवडून येणार, असे सांगत वातावरणनिर्मिती करण्याचे काम करीत होते. यासाठी ते रास, कुंडलीसह पैठणची कुंडली मांडून लोकांना पटवून देऊ लागले; पण एके दिवशी ‘शेरास सव्वा शेर’ म्हणतात तशी चांगलीच गंमत घडली. भाडोत्री ज्योतिषी शिवाजी चौकात उभ्या लोकांना भविष्य सांगत असताना पंचांग समजणारा एक कार्यकर्ता तिथे आला. त्याने ज्योतिषाला पैठण शहराची रास विचारली. त्यावर त्याने भलतीच रास सांगून आपल्या ज्ञानाचे दर्शन घडविले. त्याच्यावर खोटा ज्योतिषी म्हणून शिक्कामोर्तब होताच ज्योतिषाची चक्क साडेसाती सुरू झाली. कोणाचा माणूस म्हणून त्याला विचारणा होऊ लागली. काहींनी तर त्याला हाताखालून काढले. त्यावर ज्योतिषाने मी निवडणूक उमेदवाराचे रोजंदारीवर काम करीत असल्याचा खुलासा केला. त्यावर आणखी चापटांचा वर्षाव सुरू झाला. यात तो नजरा चुकवीत गर्दीतून फरार झाला. त्यानंतर काही वेळातच सर्व ज्योतिषी गावातून पसार झाले.
पैठणमध्ये राजकीय भविष्य सांगणाऱ्या ज्योतिषाच्या मागे साडेसाती
By admin | Updated: October 6, 2014 00:44 IST