छत्रपती संभाजीनगर : संभाजी कॉलनीत प्रमोद पाडसवान यांच्या हत्येचा तपास व पुरावे भक्कम करण्यासाठी साक्षीदारांचे न्यायालयात जबाब नोंदवण्यास सुरुवात झाली आहे. हत्येदरम्यान उपस्थित पाडसवान कुटुंबातील तिघांची साक्ष नोंदवण्यात आली. आणखी १७ ते १८ साक्षीदारांचे कलम १६४ अंतर्गत न्यायालयासमोर जबाब नोंदवण्यात येतील. भविष्यात प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान आरोपींना कठोर शिक्षा लागण्यास याची मदत होते, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
२६ ऑगस्ट रोजी प्रमोद यांच्या हत्येत शिवसेनेच्या ठाकरे गटाचा शाखा प्रमुख अरुण गव्हाडच्या अटकेनंतर शहरातील राजकीय क्षेत्रातून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. पूर्वी पिसादेवी परिसरात हॉटेल चालवणाऱ्या अरुणने गेल्या काही दिवसांत ट्रॅक्टरची एजन्सी सुरू केली होती. प्रमोद यांच्या हत्येसाठी मुख्य कारण ठरलेल्या प्लॉटच्या वादाची त्याला पूर्णपणे कल्पना होती, तरीही त्याने आरोपी ज्ञानेश्वर काशीनाथ निमोने व त्याच्या कुटुंबाला पाठिंबा दिला, वाद घालण्यासाठी सातत्याने का प्रोत्साहन दिले, यावरून शंका-कुशंका व्यक्त केल्या जात आहेत.
जयश्रीच्या शोधासाठी तीन पथकेगुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी बुधवारी सर्व आरोपींची कसून चौकशी केली. ज्ञानेश्वरच्या जुळ्या भावांना हत्येचे कुठलेच गांभीर्य नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांची पसार झालेली बहीण जयश्रीचा शोध गुन्हे शाखेची तीन पथके घेत आहेत. तिच्या सासरीदेखील पथक जाऊन आले. मात्र, ती सापडली नाही.
सेकंड हँड वाहनांचा माजज्ञानेश्वरने मुंबईहून दोन सेकंड हँड वाहने खरेदी केली होती. त्यावर राजकीय पक्षाचे चिन्ह लावून तो शहरभर मिरवत होता. हत्येनंतर हे वाहन दोन दिवस रुग्णालयाच्या आवारात उभे होते. या दोन्ही कार लावण्यासाठी निमोने कुटुंबाला जागा नव्हती. त्या कार दादागिरी करून ते पाडसवान कुटुंबाच्या घरासमोर उभ्या करायचे. त्यास विरोध करताच पुन्हा मारहाण, शिवीगाळ करायचे. त्यामुळे गणपती स्थापनेशिवाय यावरूनही आमच्यात वाद होते, अशी कबुली ज्ञानेश्वरने पोलिसांसमोर दिली.