छत्रपती संभाजीनगर : प्रमोद पाडसवान यांच्या हत्येत सोमवारी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी व कुटुंबाच्या जबाबानंतर सहा आरोपीं व्यतिरिक्त तीन आरोपी वाढवण्यात आले. यात मंडळाचा अध्यक्ष अरुण गव्हाड, मंगेश वाघ व हल्लेखोर निमोनेची बहीण जयश्री यांना आरोपी करण्यात आले. यापैकी अरुण व मंगेशला ताब्यात घेण्यात आले. तर आपल्याला आरोपी करण्यात येणार असल्याची कुणकुण लागताच जयश्री पसार झाली. तिघांवर हत्येदरम्यान हल्लेखोरांना मारण्यापासून थांबवण्याऐवजी मृत व जखमींना पकडून ठेवत हत्येसाठी अप्रत्यक्ष मदत केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
संभाजी कॉलनीत प्रमोद पाडसवान यांचे मारेकरी निमोने कुटुंब हत्येआधी व हत्येनंतर कोणाच्या संपर्कात होते, कोणाला कॉल, मेसेज केले, याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. त्या सर्वांना चौकशीसाठी बोलावून कटात त्यांचा सहभाग आहे की नाही, या दिशेने पोलिस तपास करणार असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, सोमवारी रात्री उशिरापर्यंत या गुन्ह्यात आणखी तीन आरोपी वाढण्यासाठी पोलिसांनी हालचाल सुरू केली होती.
सोमवारी दिवसभर आरोपी ज्ञानेश्वर काशीनाथ निमोने, त्याची आई शशिकला व लहान भाऊ गौरव, सौरभ, जावई मनोज, वडील काशीनाथची कसून चौकशी झाली. हत्येदरम्यान आरोपींनी घातलेले कपडे आरोपींनी लपविण्याचा प्रयत्न केला होता. सोमवारी तपास पथकाने कपड्यांसह हत्येतील दोन शस्त्रे जप्त केली. पंचनामा करून कायदेशीररीत्या चित्रीकरण करण्यात आले. सकाळी तपास पथकाने हल्लेखोरांच्या घराची झाडाझडती घेतली.
कुटुंबाच्या त्या आरोपांची चौकशीरुग्णालयात दाखल केल्यानंतर हल्लेखोर काही व्यक्तींच्या संपर्कात राहून हत्येविषयी चर्चा करीत होते. शिवाय, त्यांच्यासाठी पोलिस ठाण्यातदेखील काही जण गेल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत कसून तपास सुरू आहे. आरोपींचे मोबाइल जप्त केले असून, गेल्या काही दिवसांतील कॉल, मेसेजचे विश्लेषण करण्यात येत आहे.
राजकीय आश्रयाची सखोल चौकशी करासोमवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खा. डॉ. कल्याण काळे यांनी पाडसवान कुटुंबाची भेट घेतली. काळे यांनी मुख्यमंत्री तसेच पोलिस महासंचालकांकडे हा विषय लावून धरण्याचे आश्वासन दिल्याचे नातेवाइकांनी सांगितले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निमोने कुटुंबाला राजकीय आश्रय दिलेले पदाधिकारी, त्यांच्या व्यवसायाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.
कुटुंबाचे जबाब नोंदसोमवारी पोलिसांनी पाडसवान कुटुंबातील सात जणांचे जबाब नोंदवले. कुटुंबाने निमोने कुटुंबाव्यतिरिक्त आणखी काहींचा हत्येत सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला. सायबर पोलिसांकडून सीसीटीव्ही फूटेजचा तपास करण्यात आला. सहाही आरोपी हल्ल्यात थेट सहभागी असल्याचे स्पष्ट होत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.