छत्रपती संभाजीनगर : रोज नवनवीन कपडे घालून, सुसाट वेगात येत एक विकृत, रस्त्यावरून पायी जाणाऱ्या महिला, तरुणींना आक्षेपार्हरीत्या स्पर्श करून पसार होतोय. गेल्या १५ दिवसांपासून वेदांतनगर, उस्मानपुऱ्यातील होस्टेल, महाविद्यालयाच्या परिसरात ही संतापजनक घटना घडत आहे. सायंकाळी अंधार पडल्यावर, कमी वर्दळीच्या परिसरात त्याचा अधिक वावर आहे. यामुळे महिला, तरुणी बाहेर पडण्यासही धजावत नसल्याचे स्थानिकांनी सांगितले.
शहरात नीटच्या तयारीसाठी आलेली १८ वर्षीय सायली (नाव बदलले आहे) पन्नालालनगर येथील एका होस्टेलमध्ये वास्तव्यास आहे. बुधवारी सायंकाळी ७.३० वाजता ती मैत्रिणीसोबत परिसरात पायी फिरत होती. यावेळी एका वळणावर अचानक दुचाकीवर आलेल्या तरुणाने तिला अश्लीलरीत्या स्पर्श करून सुसाट पोबारा केला. नेमके काय घडले हे कळेपर्यंत सायली मात्र घाबरून गेली होती. स्थानिकांनी धाव घेऊन तिला धीर देत होस्टेलवर नेऊन सोडले. मात्र, या विकृतीमुळे तिच्यासह बाहेरील जिल्ह्यातून शिक्षणासाठी शहरात आलेल्या मुली घाबरून गेल्या आहेत.
तासाभराने बन्सिलालनगरमध्येपन्नालालनगर नंतर तासाभराने या विकृताने वेदांतनगरात एका महिलेसोबत असेच कृत्य केले. गेल्या १५ दिवसांपासून तो वेदांतनगर, उस्मानपुऱ्यातील अनेक भागांत पायी चालणाऱ्या महिला, तरुणींना आक्षेपार्ह स्पर्श करून पसार होतो. काहीवेळा स्थानिकांनी, तरुणींनी त्याचा पाठलाग केला. मात्र, तो हाती लागला नाही. विशेष म्हणजे, एकाच दुचाकीवर हा विकृत फिरत असून, रोज चांगले कपडे घालून हे कृत्य करत आहे.
एका मुलीला नख लागलेवेदांतनगर, उस्मानपुऱ्यात ५० पेक्षा अधिक मुलींची हॉस्टेल्स आहेत. त्यात काही रहिवासी, काही व्यावसायिक आहेत. त्यामुळे येथे रोज विद्यार्थिनींचा वावर असतो. महाविद्यालय, ट्यूशनलाही ये-जा असते. अनेक वर्षांनंतर असा प्रकार घडत असल्याचे विद्यार्थी आणि होस्टेल चालकांनी सांगितले. एका घटनेत याच विकृताने मुलीच्या खांद्याला धक्का देऊन स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. त्यात मुलीच्या खांद्यावर नखेही ओरबाडली गेली. सायंकाळनंतर आम्हाला रस्त्यावर फिरायची भीती वाटते, अशा प्रतिक्रिया विद्यार्थिनींनी दिल्या आहेत.
लवकरच पकडला जाईलवेदांतनगर ठाण्यातील सर्व अंमलदार, अधिकाऱ्यांना सायंकाळी ६ नंतर परिसरात फिरण्याचे आदेश दिले आहेत. कुठेही असे प्रकार घडत असतील तर मुलींनी थेट माझ्याकडे तक्रार करावी. तिची ओळख गोपनीय राहील. लवकरच त्या विकृताला अटक होईल.— नितीन बगाटे, पोलिस उपायुक्त