कन्नड : तालुक्यातील बनशेद्रा शिवारात कन्नड-वैजापूर महामार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात १ जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. गोकुळ कांतिलाल चंदवाडे (वय ३० रा. शिरसगाव) असे मृताचे नाव आहे.
शिरसगाव येथील गोकुळ कांतिलाल चंदवाडे हे त्यांच्या दुचाकीवर (एम. एच. २०, डी.एन. ६५८७) कन्नडहून गावाकडे जात असताना बनशेद्रा शिवारात समोरून येणाऱ्या दुचाकीने (एम. एच. २०, जी.ए. ३४५७) त्यांना जोराची धडक दिली. यात अपघातात गोकुळ चंदवाडे यांचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या दुचाकीवरील घनशाम भावसिंग चव्हाण (वय ३७, रा.चंद्रलोक नगरी, कन्नड) हे गंभीर जखमी झाले. या अपघातात दोन्ही दुचाकींचा चुराडा झाला.
यावेळी या रस्त्याने येणारे सामाजिक कार्यकर्ते युवराज बोरसे यांनी घनश्याम चव्हाण यांना स्वतःच्या वाहनातून कन्नड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच कन्नड शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कन्नड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. मृत गोकुळ चंदवाडे यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.