औरंगाबाद : शहरातील मोठमोठ्या इमारतींमधील पार्किंगची जागा गायब झाली आहे. महापालिकेच्या नगररचना आणि अतिक्रमण हटाव विभागाने संयुक्त मोहीम राबवित आठ ठिकाणी कारवाई सुद्धा केली. मात्र नंतर या मोहिमेला ब्रेक लागला. पहिल्या टप्प्यातील ३९ जागांची पार्किंग मोकळी करण्यात आली नाही. आता दुसऱ्या टप्प्यातील आणखी १०० जागांची यादी अतिक्रमण विभागाला सोपविण्यात आली.
शहरातील मुख्य रस्त्यांवरील अनेक व्यावसायिक इमारतींमधील पार्किंगच्या जागा गायब झाल्या आहेत. पार्किंगच्या जागांमध्ये बांधकाम करुन दुकानांची विक्री केली गेली आहे. त्यामुळे अनेक व्यावसायिक इमारतींमध्ये वाहनांच्या पार्किंगसाठी जागाच शिल्लक नाही. खरेदीसाठी किंवा कामासाठी आलेल्या नागरिकांना नाईलाजास्तव वाहने रस्त्यावर लावावी लागत आहेत. महापालिकेने अशा ३९ इमारतींची यादी तयार करुन पाडकाम सुरू केले. तीन ते चार ठिकाणी मनपाकडून कारवाई करण्यात आली. त्यानंतर राजकीय विरोधामुळे मोहिमेला ब्रेक लागला. शहरात मुख्य जालना रोडवर तर दोन्ही बाजूंनी पार्किंगच्या जागांवर अतिक्रमण करून बांधकामे झाली आहे. तरी प्रशासनाने दखलपात्र कारवाई अद्याप केलेली नाही. राजकीय विरोधामुळे महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी कारवाईला तयार नाहीत. त्यातच नगररचना विभागाकडून आणखी १०० पार्किंगच्या जागांची यादी अतिक्रमण विभागाकडे देण्यात आल्याचे सहायक संचालक नगररचना जयंत खरवडकर यांनी सांगितले. अतिक्रमण विभागाकडे यादी दिल्यानंतर कारवाई करण्याची त्यांची जबाबदारी आहे. परंतु कारवाई संथगतीने का होत आहे याबद्दल त्यांनी मात्र सांगण्यास नकार दिला. अतिक्रमण विभागातील अधिकारी, कर्मचारी कारवाई करण्यास फारसे उत्सुक नसल्याचे दिसून येत आहे.