छत्रपती संभाजीनगर : जीवनशैलीतील बदल, तणाव, चुकीचे आहारतत्त्व आणि शारीरिक निष्क्रियता यामुळे लठ्ठपणा झपाट्याने वाढत आहे. विशेषतः तरुण आणि लहान वयोगटातील मुलांमध्येही हा धोका मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. गेल्या १० वर्षांत स्थूलपणात दुप्पट वाढ झाली आहे. एका लठ्ठपणामुळे किमान १० आजारांना सामोरे जावे लागत असल्याची चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली.
दरवर्षी ४ मार्च रोजी ‘जागतिक लठ्ठपणा दिन’ साजरा केला जातो. या दिवसाचे उद्दिष्ट लठ्ठपणासंबंधी जागरूकता वाढवणे, प्रतिबंधात्मक उपाय शोधणे आणि लोकांना निरोगी जीवनशैली स्वीकारण्यास प्रवृत्त करणे हे आहे. लठ्ठपणामुळे उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल वाढणे आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. इन्सुलिन प्रतिकारशक्ती कमी झाल्याने टाईप-२ मधुमेह होण्याची शक्यता असते. सांधेदुखी आणि हाडांच्या आजारांमध्येही लठ्ठपणाचा मोठा वाटा असतो; कारण वाढलेले वजन गुडघे, मांड्या आणि कंबरेवर अतिरिक्त ताण टाकते. फुप्फुसांवरही लठ्ठपणाचा परिणाम दिसतो. विशेषतः झोपेच्या वेळी श्वास घेण्यास त्रास होणे, सतत घोरणे आणि थकवा जाणवणे ही लठ्ठ लोकांमध्ये आढळणारी लक्षणे आहेत. लठ्ठपणामुळे यकृतात चरबी साठते आणि त्यामुळे नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीस होण्याचा धोका वाढतो. मानसिक आरोग्यावरही लठ्ठपणाचा परिणाम होतो. आत्मविश्वास कमी होणे, नैराश्य जाणवणे, समाजात चिडवले जाणे आणि त्यामुळे मनोबल खचणे असे परिणाम दिसून येतात, असे तज्ज्ञांनी सांगितले.
कॅन्सरचा धोकालठ्ठपणामुळे स्तन, गर्भाशय, आतडे आणि प्रोस्टेट कर्करोगाचाही धोका वाढतो. पचनासंबंधी समस्या, अपचन, ॲसिडिटी आणि पित्ताशयात खडे होण्याचाही धोका असतो. त्यामुळे लठ्ठपणाकडे दुर्लक्ष करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरते. संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि तणावमुक्त जीवनशैली अंगीकारल्यास लठ्ठपणावर नियंत्रण मिळवता येते आणि त्यामुळे संबंधित आजारांचा धोका कमी होतो, असे तज्ज्ञ म्हणाले.
वजन नियंत्रणात ठेवा१० वर्षांपूर्वी ओपीडीत येणाऱ्या १० पैकी २ जणांमध्ये लठ्ठपणा पाहायला मिळत होता. आता हे प्रमाण १० पैकी ४ इतके झाले आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये लठ्ठपणा वाढला आहे. लठ्ठपणामुळे किमान १० ते १५ आजार होतात. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवले पाहिजे.- डाॅ. नीलेश लोमटे, लठ्ठपणा, हार्मोन्सतज्ज्ञ