छत्रपती संभाजीनगर : शहरातील रस्त्यांवर सकाळी आणि रात्री मोकाट कुत्र्यांची दहशत पाहायला मिळत आहे. चिंताजनक बाब म्हणजे मोकाट कुत्रे रोज जवळपास ३४ जणांचे लचके तोडत असल्याची स्थिती आहे. जिल्हा रुग्णालयात चार महिन्यांत उपचार घेतलेल्या रुग्णांच्या संख्येवरून ही स्थिती समोर आली आहे. शहरातील रस्ते, गल्लीबोळ, वसाहती आणि चौकांमध्ये मोकाट कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. माॅर्निंग वॉकला निघालेले नागरिक असोत, रात्री कामावरून परतणारे कर्मचारी, सर्वांमध्ये मोकाट कुत्र्यांविषयी भीती पाहायला मिळत आहे.
एकट्या जिल्हा रुग्णालयात जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत मोकाट कुत्र्याने चावा घेतलेल्या ४ हजार १०७ रुग्णांवर उपचार करण्यात आले. जिल्हा रुग्णालयात अँटी रेबीज व्हॅक्सिन आणि अँटी रेबीज सिरम उपलब्ध असल्याचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. पद्मजा सराफ यांनी सांगितले.
अशी घ्या काळजी...- शक्यतो पहाटे किंवा उशिरा एकटे बाहेर जाणे टाळावे.- कुत्रा जवळ येत असल्यास पळू नका, शांतपणे थांबावे.- लहान मुलांना एकट्याने शाळेत किंवा खेळायला जाऊ देऊ नये.- कुत्र्याने चावल्यास त्वरित जखम स्वच्छ करावी आणि रुग्णालयात जावे.- रेबीज प्रतिबंधक लस वेळेत घेणे अत्यावश्यक आहे.