औरंगाबाद : आरोग्य समितीने ठरविल्यानुसार आरोग्य सभापती व जिल्हा आरोग्य अधिकारी यांचा मंगळवारपासून एकत्रित पाहणी दौरा आखण्यात आला होता. दौऱ्यावर जाण्यासाठी सभापती विनोद तांबे सकाळीच त्यांच्या कक्षात येऊन बसले; परंतु जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार कालच बाहेरगावी निघून गेले होते. बराच वेळ ताटकळलेल्या सभापतींनी मग यासंबंधीची तक्रार करण्यासाठी सीईओंचा कक्ष गाठला, तेव्हा तेही बाहेरगावी असल्याचे समजले. आरोग्य विभागाचे कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत, रुग्णांना आरोग्यसेवा व्यवस्थित मिळत नाही, आरोग्य कर्मचाऱ्यांचेही अनेक प्रश्न आहेत, आदींबाबत आरोग्य समितीच्या मासिक बैठकीत चर्चा झाली होती. त्यावर उपाय म्हणून तांबे व डॉ. जमादार यांचा एकत्रित दौरा आयोजित करण्यात आला होता. जिल्ह्यातील कोणत्याही प्राथमिक आरोग्य केंद्रास मंगळवार (दि.२) पासून अचानक भेटी देण्याचे ठरले होते. त्या संदर्भातील दौराही निश्चित करण्यात आला होता. नियोजनानुसार सभापती सकाळीच जिल्हा परिषदेत दाखल झाले; परंतु आरोग्य विभागातून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे तांबे यांनी चौकशी केली असता, जिल्हा आरोग्य अधिकारी तीन दिवसांच्या शासकीय दौऱ्यावर बाहेरगावी गेले आहेत. सभापतींच्या नियोजनाबद्दल त्यांनी कार्यालयास काहीही माहिती दिली नव्हती. संतप्त सभापतींनी ही तक्रार सीईओंकडे करण्यास कूच केली, तेव्हा सीईओही बाहेरगावी असल्याचे समजले.
सभापती कार्यालयात, अधिकारी बाहेरगावी
By admin | Updated: December 4, 2014 00:28 IST