आता जिल्हा परिषद मुख्यालयातील ‘स्ट्राँग रूम’द्वारे राहील कामकाजावर नजर
By विजय सरवदे | Published: January 4, 2024 12:10 PM2024-01-04T12:10:27+5:302024-01-04T12:15:02+5:30
सीईओ विकास मीना यांचा नव्या वर्षाचा संकल्प - विजय सरवदे
छत्रपती संभाजीनगर : काही प्रमुख विभागांच्या कामकाजावर रोजच्या रोज देखरेख ठेवण्यासाठी जि. प. मुख्यालयात ‘एकल निरीक्षण प्रणाली’ अर्थात एक ‘स्ट्राँग रूम’ सुरू केली जाणार आहे. ज्यामुळे निदर्शनास येणाऱ्या त्रुटी दूर करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन लगेच त्याबाबत उपाययोजना करता येतील. या माध्यमातून अधिक गतिमान प्रशासन करण्याचा आपला संकल्प आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
मावळत्या वर्षात विविध विकासकामे तसेच शासकीय योजना वेळेत मार्गी लावण्यात बऱ्यापैकी यश आले. यापेक्षा अधिक गतिमान प्रशासन करण्यावर आपला भर राहणार आहे. प्रशासकीय इमारतीच्या बांधकामामुळे सध्या काही विभाग इतरत्र विखुरलेले आहेत. आता प्रशासकीय इमारतीचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. सर्व विभाग एकाच छताखाली आल्यास अधिकारी व कर्मचाऱ्यांवर प्रशासनाचा दबाव असतो. त्यासाठी नवीन वर्षात ही नवीन प्रशासकीय इमारत ‘टेक ओव्हर’ करण्याचा आपला प्रयत्न आहे. कंत्राटदाराकडेही आपण आग्रह धरलेला आहे. हे शक्य होत नसेल, तर किमान काही विभागांसाठी तरी या इमारतीत कार्यालये सुरू केली जातील.
जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक गावातील कुटुंबांना नळाद्वारे ‘हर घर जल’ देण्याचा केंद्र सरकारचा उपक्रम जिल्हा परिषदेने हाती घेतला आहे. यासाठी मार्चअखेरची ‘डेड लाइन’ आहे. परंतु, यासाठी मुदतही वाढू शकते. मात्र, आम्ही मार्चअखेरपर्यंत प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे पाणी देण्याचा निर्धार केला आहे, असेही मुख्य कार्यकारी अधिकारी मीना यांनी सांगितले.
याशिवाय, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात दौलताबादच्या कुशीत असलेल्या मोमबत्ता तलावात आऊट सोर्सिंगच्या माध्यमातून ‘बोटिंग’ सुरू केले जाणार आहे. नौकाविहार (बोटिंग) प्रकल्पासाठी काढण्यात आलेली निविदा अंतिम झाली आहे. पंचायत डेव्हलपमेंट इन्डेक्समधील निर्देशांकाच्या माध्यमातून ४४ ग्रामपंचायती शाश्वत विकासकामांमध्ये पुढे आहेत. यापैकी किमान ५ ग्रामपंचायती राज्यस्तरीय स्पर्धेत निवडल्या जातील.
कशी असेल स्ट्राँग रूम
प्रामुख्याने आरोग्य, शिक्षण, महिला व बालविकास तसेच पशुसंवर्धन या विभागांचे ‘डे टू डे मॉनिटरिंग’ करण्यासाठी सुरू करण्यात येणाऱ्या ‘स्ट्राँग रूम’मध्ये संबंधित विभागाचे दोन-दोन अधिकारी नियुक्त केले जाणार आहेत. ते आपापल्या विभागाच्या उपक्रमांचे निरीक्षण करतील. काही त्रुटी आढळल्यास लगेचच त्याचे निवारण करण्याच्या संबंधितांना सूचना देतील.