छत्रपती संभाजीनगर: ''सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या झाल्यानंतर मस्साजोगचे रहिवासी आणि जनता रस्त्यावर उतरल्याने याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. वाल्मीक कराड यास अटक झाली आणि आज धनंजय मुंडेला राजीनामा द्यावा लागला. जनतेने उठाव केला नसता तर सरकारने हे प्रकरण दाबून टाकले असते'', असा आरोप मराठा आरक्षण लढ्याची नेते मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत केला. आता मुंडे याला आरोपी करावे अशी मागणी ही त्यांनी केली.
शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेले मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी दुपारी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, ''मंत्री धनंजय मुंडे यांच्या पाठबळामुळेच वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीने मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या केल्याचा आमचा पहिल्या दिवसांपासून आरोप आहे. राजकीय पाठबळाशिवाय कराड आणि त्याच्या गुंडांनी एवढे धाडस केले नसते. संतोष देशमुख यांच्या हत्येचे छायाचित्र समाजमाध्यमावंर व्हायरल झाले. हे छायाचित्र पाहुन जनतेमध्ये कराड आणि त्याच्या टोळीविरोधात प्रंचड संताप आहे. आज जनरेट्यामुळे मुंडेला मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे''.
आता मी कराडला सांगतो की, तू धनंजय मुंडेसाठी खंडणी मागितल्याची कबुली दे अन्यथा तू आयुष्यभर जेलमध्ये राहशील आणि मुंडे बाहेर मजा करीत राहिल. खरे तर समाज आणि मस्साजोगच्या जनतेने या सरकारला उघडे पाडले आहे, कारण मस्साजोगच्या गावकऱ्यांनी आणि समाजबांधवांनी आंदोलन केले नसते तर देशमुख यांच्या क्रूर हत्येचा गुन्हा दाखल झाला नसता. हे प्रकरण सरकारने दाबून टाकण्याच्या प्रयत्नात हाेते. या हत्येशी संबंधित आणखी काही गुन्हेगार आणि सुमारे २५ पोलिसांनाही सहआरोपी करावे, अशी आमची मागणी असल्याचे मनोज जरांगे म्हणाले.
धनंजय मुंडेने राजीनामा देतानाही माज दाखविला जनतेच्या रेट्यामुळे आज धनंजय मुंडेने मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. वैद्यकीय कारणामुळे राजीनामा देत असल्याचे कराण त्यांनी राजीनामापत्रात दिले आहे, यावरुन मुंडे यांना किती माज आहे, असा आरोप जरांगे यांनी केला.
पहाटे चार वाजताचा मस्साजोगला रवानाप्रकृती खालावल्याने सोमवारी सकाळपासून शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. रात्री देशमुख यांची निर्घृण हत्या करतानाचे व्हायरल झालेली छायाचित्रे पाहून मनोज जरांगे पाटील हे व्यथित झाले. मंगळवारी पहाटे ४ वाजताच रुग्णालयातून मस्साजोगला कार ने रवाना झाले. सकाळी ६ वाजता पोहचून त्यांनी संतोष देशमुख यांच्या परिवाराची भेट घेतली. यानंतर दुपारी १२ वाजता ते परत रुग्णालयात परतले.