छत्रपती संभाजीनगर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवात डीजेच्या जास्त आवाजाचा पोलिसांसह सामान्यांनाही त्रास झाला. याची गंभीर दखल घेत एकट्या क्रांती चौक पोलिस ठाण्यात ३१ डीजे चालक, आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. निवासी भागात ५५ डेसिबलपर्यंत आवाजाची मर्यादा असताना पोलिसांच्या तपासणीत सोमवारी पार १३५ डेसिबलपर्यंत आवाज पोहोचल्याने गुन्हे दाखल करण्यात आल्याचे पोलिस उपायुक्त नितीन बगाटे यांनी सांगितले.
सोमवारी डॉ. आंबेडकर जयंती शांततेत पार पडली. मात्र, काही आयोजकांनी शासनाने ठरवून दिलेल्या आवाजाची मर्यादा ओलांडली. पोलिस आयुक्तालयात पार पडलेल्या शांतता समिती बैठकीत पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त बगाटे यांनी डीजेच्या आवाजाची मर्यादा पाळण्याचे आवाहन केले होते. मात्र, अनेक आयोजकांनी सूचनेला बगल दिली. जादा आवाजामुळे आम्हाला मिरवणुकीत नाचण्याचा आनंदही घेता आला नाही, अशी खंतही तरुणींसह महिलांनी व्यक्त केली.
या आयोजकांवर गुन्हे (ओलांडलेली मर्यादा डेसिबलमध्ये)प्रशांत गजहास (१३५.८), रमाकांत इंगळे (१३२.६), किरण जाधव (१३०), संदीप आढाव (१२६), राजेश हिवाळे (१२२.७), बाळूभाऊ शिंगाडे (१२०.७), द ग्रेट बौद्ध मित्रमंडळ (११८.९), रिंकू जाधव (११८.७), शरद मिसाळ (११८.१), मुकेश खिल्लारे (११७.१), आनंद साळवे (११६.४), राजीव जवळीकर (११६), अमोल पाटील (११५.९), सिद्धार्थ जाधव (११५.८), पवन चव्हाण (११४.१), अभिजित जाधव (११४.०), जुना बायजीपुरा मित्रमंडळ (११४.९), विलास सुखधान (११३.४), विजय मगरे (११२.३), कुशाल गायकवाड (१११.५), नितीन वाहूळ (१११.९), नितीन साळवे (१११.३), अजय बोर्डे (१११.३), सागर बागूल (१११), अमोल पवार (११०.४), अनिल बिरारे (११०.७), राहुल मकासरे (११०.१), विनाेद बनकर (१०९.३), संदीप हिवराळे (१०८.४), अजय रगडे (१०८), नरेश पाखरे (१०४.८).
पोलिसांच्या सूचनेकडे दुर्लक्षसायंकाळी ७ वाजेनंतर क्रांती चौक ते गुलमंडी दरम्यान या आयोजकांनी ध्वनिमर्यादा ओलांडली. पोलिसांनी अरुण बोर्डे, अमोल पाटील, पवन चव्हाण यांना प्रत्यक्ष भेटून तर काही आयोजकांच्या स्टेजजवळ जाऊन आवाज कमी करण्यास सांगूनही दुर्लक्ष करण्यात आले. सिडको ठाण्याच्या हद्दीत ७ आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यासाठी वरिष्ठांकडे अहवाल पाठविल्याचे निरीक्षक साेमनाथ जाधव यांनी सांगितले.