औरंगाबाद: मनपाने शहरातील रस्ते डांबराऐवजी सिमेंटने बांधले असून, वाहतुकीस अनेक ठिकाणी मोठेही केले आहे; परंतु एमजीएमसमोरील रस्त्यावर दुचाकी वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला जात आहे. याकडे मनपा तसेच वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे.
पदपथांचा दुरुपयोग सातत्याने होत आहे. लॉकडाऊनमुळे रहदारी बंद असली तरी दवाखान्यासमोरील मेडिकल अथवा चहा, नाष्ट्याच्या दुकानासमोर पदपथ असतानादेखील त्याचा वापर होताना दिसत नाही; परंतु नव्याने तयार करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्यावरच वाहनाची पार्किंग करून अपघातास निमंत्रण दिले जात आहे. सिमेंट रस्त्याच्या बाजूला असलेला पदपथ अतिक्रमणाच्या विळख्यात जाण्याची भीती दक्ष नागरिकांनी व्यक्त केली आहे. कोविडमुळे रुग्णांची ने-आण करणाऱ्या रुग्णवाहिकांनादेखील अडथळ्याला तोंड द्यावे लागत आहे. मनपा व वाहतूक शाखेच्यावतीने लक्ष देऊन वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
कॅप्शन.. एमजीएमसमोरील सिमेंट रस्ता अघोषित वाहनतळ बनला आहे, याकडे मनपा तसेच वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष असल्याचे जाणवते.