नांदेड : देशभरात मोदी लाटेची चर्चा असताना नांदेडकरांनी मात्र अशोकराव चव्हाणांच्या रुपाने पुन्हा एकदा काँग्रेसच्याच पारड्यात आपले मत टाकले़ काँग्रेसचा राज्यभरात सफाया झालेला असताना नांदेडचा बालेकिल्ला ८१ हजार ४५५ इतक्या मताधिक्याने राखत नेतृत्वावर विश्वास दाखविला़ काँग्रेस आघाडीकडून माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना उमेदवारी घोषित झाल्यानंतर संपूर्ण देशाचे लक्ष नांदेडकडे लागले होते़ त्यात प्रचाराच्या सुरुवातीला भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची मोठी सभा झाली़ त्यामुळे प्रतिस्पर्धी उमेदवार डी़ बी़ पाटील शेवटपर्यंत मोदी लाटेवरच अवलंबून राहिले़ तर दुसरीकडे चव्हाण यांनी सभा आणि प्रचारफेर्यांनी मतदारसंघ पिंजून काढला होता़ प्रचारात अखेरपर्यंत चव्हाण हेच आघाडीवर होते़ त्यामुळे नांदेडात मोदी लाटेचा परिणाम होणार की, नांदेडकर नेतृत्व जपणार याबद्दल सर्वांना उत्सुकता होती़ शुक्रवारी मतमोजणी सुरु झाल्यानंतर सकाळपासूनच अशोकरावांच्या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी जमली होती़ अशोकराव हे घरी बसूनच निकालाची माहिती घेत होते़ यावेळी त्यांच्यासमवेत पालकमंत्री डी़ पी़ सावंत, आ़ ओमप्रकाश पोकर्णा, आ़ हणमंत पाटील बेटमोगरेकर, आ़ वसंतराव चव्हाण, महापौर अब्दुल सत्तार यांची उपस्थिती होती़ त्यात पोस्टल मतदानापासूनच अशोकरावांनी आघाडी घेतली होती़ सुरुवातीच्या काही फेर्यांमध्ये एक हजारांवर असलेले मताधिक्य फेरीगणिक वाढतच गेले़ त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साहही शिगेला पोहोचला होता़ दुपारपासूनच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करण्यास सुरुवात केली होती़ अशोकरावांच्या निवासस्थानाबाहेर मोठ्या संख्येने कार्यकर्ते हार-तुरे घेवून होते़ यावेळी 'महाराष्ट्रात एकच वाघ' 'अशोकराव तुम आगे बढो' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता़ तर नांदेडकरांनी मात्र मतमोजणी केंद्राऐवजी घरी टीव्हीसमोर बसूनच निकाल जाणून घेतला़ त्यामुळे मतमोजणी केंद्राबाहेर दुपारपर्यंत बोटावर मोजण्याऐवढे कार्यकर्ते होते़ उन्हाचा पाराही जास्त असल्यामुळे रस्यावरही शुकशुकाट होता़ परंतु सायंकाळच्या वेळी मात्र गर्दीने रस्ते फुलून गेले होते़ त्यानंतर विजयी मुद्रेने अशोकरावांनी कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या़ यावेळी त्यांच्यासमवेत सुविद्य पत्नी अमिता चव्हाण होत्या़ या कारणांमुळे मिळाला विजय माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे जिल्ह्यात असलेले एकहाती नेतृत्व़ कार्यकर्त्यांची मजबूत फळी, उत्कृष्ट पक्षबांधणी त्याचबरोबर शिस्तबद्धरितीने राबविलेली प्रचारयंत्रणा काँग्रेसच्या विजयास कारणीभूत ठरले़ जिल्ह्यातील सर्व आमदार काँग्रेसचे, जिल्हा परिषद, मनपा, पंचायत समित्यांवर काँग्रेसचे असलेले वर्चस्व़ जिल्ह्याच्या विकासाची असलेली दूरदृष्टी या सर्व कारणांमुळे नांदेडकरांचा अशोकरावांच्या नेतृत्वावर असलेला विश्वास़ प्रतिस्पर्धी उमेदवार डी़बी़पाटील हे उमेदवारी मिळण्याच्या एकदिवसाआधी राष्ट्रवादीतून भाजपात आले़ त्यामुळे पक्षांतर्गत त्यांना असलेला विरोध़ कमकुवत प्रचारयंत्रणा, कार्यकर्त्यांची नसलेली मजबूत फळी, केवळ मोदी लाटेवर विसंबून राहणे पाटील यांना भोवले़
नांदेडात ओन्ली अशोकराव़़़
By admin | Updated: May 17, 2014 01:09 IST