खुलताबाद : जगप्रसिद्ध वेरुळ लेणी बघण्यासाठी आलेल्या महिलेची पर्स अज्ञात महिलेने शिताफीने उघडून आतील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा जवळपास ८० हजारांचा ऐवज चोरी केला. या प्रकरणी खुलताबाद पोलिस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागपूर शहरातील मोमीनपुरा येथील शेख काजल शेख हसीम या नातेवाईक आणि मैत्रिणींसोबत १८ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगरहून वेरुळ लेण्या बघण्यासाठी आल्या होत्या. लेणी क्र. १६ बघितल्यानंतर शेख काजल यांनी आपली पर्स उघडून बघितली असता पर्स उघडी असलेली दिसली, तसेच पर्समध्ये ठेवलेल्या पाकीटमधील सोन्याचे दागिने व रोख रक्कम ४ हजार ५०० रुपये पर्समध्ये दिसून आले नाहीत. त्यानंतर, त्यांनी लेण्यांमधील व्हिडीओ पाहिले असता, एक अनोळखी महिला त्यांच्या पर्समधील दागिने आणि रोख रक्कम काढत असल्याचे दिसले. त्यानंतर, त्यांनी खुलताबाद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.