छत्रपती संभाजीनगर : भीमजयंतीनिमित्त २८ ते ३० मार्चदरम्यान रोज सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत ‘नागसेन फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले आहे. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या आजी-माजी विद्यार्थ्यांच्या वतीने यंदाचा हा ९ वा महोत्सव रंगणार असून ही केवळ कला आणि साहित्याची पर्वणी नाही, तर विचारांचे आणि समतेच्या मूल्यांचे एक अनोखे विचारपीठ असणार आहे.
नागसेन फेस्टिव्हलचे निमंत्रक सचिन निकम यांनी कळविले आहे की, नागसेनवनातील लुम्बिनी उद्यानात २८ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता या फेस्टिव्हलचे उद्घाटन प्रख्यात छायाचित्रकार पद्मश्री सुधारक ओलवे यांच्या हस्ते होणार आहे. फेस्टिव्हलमध्ये सलग तीन दिवस कला संगीत, व्याख्यान, परिसंवाद, बहुभाषिक कविसंमेलन, भित्तिपत्रके, मुलाखती, भीमगीत नृत्य आणि आंबेडकरी रॅप अशा विविध उपक्रमांची रेलचेल राहील. ३० हून अधिक कलावंतांच्या विविध कलाकृतींचे प्रदर्शन होणार असून, प्रत्यक्ष कलाकृती निर्मितीचा अनुभवही रसिकांना मिळणार आहे. विविध प्रकारच्या पेंटिंग्ज, शिल्पकला आणि इतर माध्यमांच्या कलाकृती प्रेक्षकांना पाहायला मिळतील. या महोत्सवात सुधारक ओलवे यांच्या फोटोग्राफीचे प्रदर्शन, प्रसिद्ध चित्रकार आणि अभिनेत्री शुभा गोखले यांच्या कलाकृतींचे विशेष प्रदर्शन राहणार आहे. या महोत्सवात सिनेअभिनेते कैलास वाघमारे यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
भीमजयंतीचे औचित्य साधून नागसेन फेस्टिव्हलमध्ये लोकशाही, समता आणि स्वातंत्र्य यांचा जागर घालण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव विविध कला आणि साहित्याच्या माध्यमातून लोकांसमोर मांडण्यात येणार आहे. या महोत्सवात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नागसेन फेस्टिव्हल समितीने केले आहे.