छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुका धोरणात्मक मुद्यांवर युती, आघाडी करून लढणे ठीक आहे. परंतु महापालिका व जिल्हा परिषद, नगर परिषदेच्या निवडणुका ग्राऊंडवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या असतात. मागील पाच वर्षांपासून या निवडणुका झालेल्या नाहीत. आगामी काळात त्या होणे शक्य असून, त्या भाजपने स्वबळावर लढाव्यात, यावर प्रदेशाध्यक्षांसोबत झालेल्या बैठकीत चिंतन करण्यात आले. शिंदेसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाशी युती नको, अशी भूमिकाही पदाधिकाऱ्यांनी मांडली.
जिल्ह्यासह राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर युतीला सर्व पक्षांचा आत्मविश्वास वाढला. त्यात महत्त्वाचे म्हणजे भाजपच्या राज्यात सर्वाधिक जागा निवडून आल्या आहेत. त्यामुळे भाजपच्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेत स्वबळावर लढण्याची दुर्दम्य इच्छा आहे. कारण पक्षात इच्छुकांची संख्या एवढी मोठी आहे, की एखाद्याला न्याय मिळाला नाही तर बंडखोरी होईल. थोड्याफार फरकाने अनेक जागा पडतील. परिणामी, पालिकेत सत्ता येण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. त्यामुळे असे काहीही प्रकार होऊ नयेत, यासाठी सरळ-सरळ स्वबळावर निवडणुकांना सामोरे गेल्यास पक्षातील अनेकांना उमेदवारीची संधी मिळेल, अशी भूमिका नेत्यांनी प्रदेश समितीकडे झालेल्या बैठकीत घेतली.
२०२० पासून निवडणुका नाहीत२९ एप्रिल २०२९ साली पालिकेची मुदत संपली. तेव्हापासून आजवर मनपाच्या निवडणुका झालेल्या नाहीत. कोरोना संसर्गामुळे निवडणुका लांबल्या, त्यानंतर ओबीसी आरक्षणाचा मुद्दा समोर आला. प्रकरण कोर्टात न्यायप्रविष्ट आहे. राज्यात झालेला राजकीय भूकंपाची निवडणुका लांबण्यात भर पडली. आता महायुतीला विधानसभेत मोठे यश मिळाले आहे. त्यामुळे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याकडे भाजपसह सर्व पक्ष सरसावले आहेत.
आम्ही स्वबळावर लढण्याची मागणी केलीस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढविण्याची मागणी प्रदेशाध्यक्षांकडे केली आहे. पक्षातील कार्यकर्त्यांच्या या निवडणुका आहेत. त्यामुळे प्रत्येकाला उमेदवारीची अपेक्षा आहे. मनपाच्या वॉर्डानुसार जेवढे प्रभाग होतील, त्या सर्व प्रभागांत भाजप उमेदवार देणार आहे. भाजपला १०० टक्के यश मिळण्याची खात्री असून, लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत पक्ष कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी शहरातील तिन्ही मतदारसंघांत प्रचंड मेहनत घेतल्यामुळेच तिन्ही जागांवर महायुतीचा विजय झाला आहे.- शिरीष बोराळकर, शहराध्यक्ष, भाजप