विजय चोरडिया , जिंतूरमहाराष्ट्र रोजगार हमी योजनेअंतर्गत तालुक्यातील झालेल्या निकृष्ट कामाच्या चौकाशीसाठी मुंबईचे पथक जिंतुरात दाखल झाले असून तालुक्यातील सर्वाधिक कामे झालेल्या गावांच्या तपासण्या हे पथक सोमवारपासून करणार आहे.महाराष्ट्र रोजगार हमी योजनेअंतर्गत तालुक्यामध्ये कोट्यवधी रुपयांची कामे झाली. या कामाच्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयापासून ते मंत्रालयापर्यंत वेगवेगळ्या सामाजिक संघटनांनी तक्रारी दाखल केल्या होत्या. यामुळे राज्य शासनाने तालुक्यामध्ये ज्या गावात सर्वाधिक कामे झाली होती, अशा गावांचे सामाजिक अंकेक्षण करण्याचे ठरविले. त्यासाठी मुंबई येथून चार अधिकारी जिंतुरात दाखल झाले असून मनरेगामध्ये काम करणाऱ्या यंत्रणेतील ग्रामरोजगार सेवक, पंचायत समितीतील कर्मचारी आदींचे सहकार्य ही कमिटी घेणार आहे. कमिटीने वेगवेगळी तीन पथके तयार केली आहेत. ही तीन पथके प्रत्यक्ष गावात जाऊन कामाच्या संदर्भात तपासण्या करणार आहे. ग्रामरोजगार सेवक व इतर कर्मचाऱ्यांना या पथकाने कामाची तपासणी कशी करावी, या संदर्भातील प्रशिक्षण दिले. २३ जूनपासून तालुक्यातील इटोली, धमधम, रिडज, वाघी बोबडे, पिंपळगाव, केहाळ, मोहखेडा, दाभा या गावांच्या तपासण्या करण्यात येणार आहेत. तालुक्यामध्ये मनरेगा अंतर्गत कोट्यवधी रुपयांची कामे करण्यात आली. तालुक्यामध्ये १७० गावे असली तरी सर्वाधिक कामे दहा ते १५ गावांतच झाली. विशेष म्हणजे, एकाच वेळी दहा ते पंधरा कामांना मंजुऱ्या देण्यात आल्या. परिणामी मनरेगा काही गावांपुरतीच मर्यादित राहिली. या गावांतील गुत्तेदार व संबंधित यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी सांगड घालत कोट्यवधी रुपयांची कामे केली. इटोलीमध्ये दोन पाझर तलाव, ११ ठिकाणी वृक्ष लागवड, २५ वैयक्तिक लाभाच्या विहिरी, दोन जोड रस्ते, एक अंतर्गत रस्ता, १४ मातीनाला बांध, ८ सिमेंट नाला बांध, एक नाला सरळीकरण आदी कामे करण्यात आली. पिंपळगाव काजळेमध्ये पाच रोपवाटिका, ८ लाभार्थ्यांनी वृक्ष लागवड, ४ वैयक्तिक विहिरी, तीन ठिकाणी अंतर्गत रस्ते, तीन ठिकाणी नाला सरळीकर, सिमेंट, माती नाला बांध अशी कामे करण्यात आली. दाभा येथे शेतरस्ता, तीन ठिकाणी रोपवाटिका, सहा ठिकाणी वृक्षलागवड, नाला सरळीकरणाची चार कामे, दोन पाझर तलाव, ८ मातीनाला बांध, दोन शेततळे आदी कामे करण्यात आली. वाघी बोबडे येथे दोन ठिकाणी वृक्ष लागवड, कॅनॉल भागातील रस्ता तीन ठिकाणी, रस्त्याची कामे, नाला सरळीकरण एक ठिकाणी आदी कामे झाली. बहुचर्चित धमधममध्ये तीन शेततळे, ११ विहिरी, १५ मातीनाला बांध, तीन सिमेंट बंधारे, दोन नाला सरळीकरण, एक पाझर तलाव आदी कामे झाली. रिडजमध्ये तीन ठिकाणी शेत रस्ते, कॅनॉलरस्ता, पाणंद रस्ता, सात विहिरी व चार ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आली.केहाळमध्ये रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड, १२ विहिरी, नाला सरळीकरणाचे तीन कामे, १६ मातीनाला बांध व २ रोपवाटिका आदी कामे झाली. तर मोहखेडामध्ये रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड, तीन ठिकाणी अंतर्गत रस्ते, ८ ठिकाणी सिमेंट बंधारे, पाच ठिकाणी मातीनाला बांध, तीन ठिकाणी नाला सरळीकरण, एक ठिकाणी गाव तलाव, रोपवाटिका, वृक्षलागवड व विहीर आदी कामे झाली. या आठ गावांत झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या कामांची पाहणी ही कमिटी करणार आहे.सर्वाधिक कामे असलेल्या गावांची निवडमनरेगाच्या तपासणीसाठी जिंतूर तालुक्यातील सर्वाधिका कामे ज्या गावात झाली त्या आठ गावांची निवड कमिटीने तपासणीसाठी केली आहे. प्रत्यक्ष गावात जाऊन कमिटी कामाची तपासणी करुन मोजमाप पुस्तिका, रोजगारांचे हजेरीपट, त्यांना मिळालेली मजुरी, कुशल व अकुशल कामांचा आढावा घेणार आहे. काम असेल तरच दाममनरेगामध्ये अनेक ठिकाणी कामेच करण्यात आली नाहीत. प्रत्यक्षात कामाच्या ठिकाणी जाऊन अभियंत्यांनी मोजमाप पुस्किा लिहिली नाहीत. अभियंत्याच्या घरी, हॉटेल किंवा इतर ठिकाणी कामाच्या पुस्तिका लिहिण्यात आल्या. या आधारे आता प्रशासन कामाची रक्कम अदा करणार आहे. प्रशासनाने आता तरी डोळे उघडे ठेवून प्रत्यक्ष काम झाले असेल तरच बिले काढावित, अशी मागणी जोर धरु लागली आहेत.
मुंबईचे पथक जिंतुरात
By admin | Updated: June 23, 2014 00:18 IST