छत्रपती संभाजीनगर : पतीपासून विभक्त राहणाऱ्या २४ वर्षीय गर्भवती तरुणीने एकटीने बाळाला जन्म दिला. कुटुंबापासून ही बाब लपवण्यासाठी घरातच बाळाची नाळ कापून जन्मानंतर अवघ्या दोन तासात गोणीत गुंडाळून रस्त्यावरील कचऱ्यात फेकून दिले. विशेष म्हणजे, पहाटेच्या थंडीत या गोणीचे कुत्र्यांनी दोनदा लचके तोडण्याचा प्रयत्न केला. यात ही गोणी एकदा बसखालीही आली. तरीही तीनदा संकट ओढावूनही सतर्क नागरिकांमुळे बाळ सुखरूप राहिले. गुरुवारी पहाटे ५:३० वाजता पुंडलिकनगर गजानन महाराज मंदिर रस्त्यावर ही हृदयद्रावक घटना उघडकीस आल्याचे पोलिस निरीक्षक अशोक भंडारे यांनी सांगितले.
पाटबंधारे जलसंधारण विभागात कालवा निरीक्षक असलेले भाग्येश पुसदेकर (२८, मुळ रा. अंजनगाव, अमरावती, ह. मु. पुंडलिकनगर) हे गुरुवारी पहाटे ४:३० वाजता गावावरून शहरात परतले. सिडको चौकातून पायीच घराकडे निघाले. ५:३० वाजेच्या सुमारास पुंडलिकनगरमधील मुथूट फायनान्स कार्यालयासमोरील दुभाजकावरील कचऱ्यातून बाळाच्या रडण्याचा आवाज आला. कुत्रे गोणी ओढत होते. भाग्येश व मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांनी धाव घेत कुत्र्यांना हाकलले. पोत्याची गाठ सोडल्यावर रक्तबंबाळ अवस्थेतील नवजात बाळ पाहून सर्वांनाच गहिवरून आले. जवळच राहणाऱ्या आजीने तत्काळ चादर आणली. बाळाला त्यात गुंडाळून गजानन महाराज मंदिर परिसरातील एका नामांकित खासगी रुग्णालयात नेले. मात्र, त्यांनी उपचारास नकार दिला. त्यानंतर बाळाला घाटी रुग्णालयात दाखल केले.
अवघ्या ८ तासांत आईचा शोधही माहिती कळताच पोलिस निरीक्षक अशोक भंडारे, उपनिरीक्षक रेशीम कोळेकर, अर्जुन राऊत यांनी घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ३:३० वाजता तरुणी बाळ फेकून एका बोळीत जाताना दिसली. उपनिरीक्षक अर्जुन राऊत, सुनील म्हस्के, अंमलदार संदीप बिडकर, विलास सोळंके, प्रशांत नरवडे, स्वाती राठोड, गिरिजा आंधळे, अजय कांबळे यांनी आसपासच्या परिसरात शोध सुरू केला. तरुणीचे कपडे व चपलांवरून शोध सुरू केला. ४०पेक्षा अधिक घरांमध्ये विचारणा केल्यावर भाड्याने राहणाऱ्या गर्भवती तरुणीची माहिती मिळाली. तिला ताब्यात घेऊन चौकशी करताच तिने क्रूर कृत्याची कबुली दिली. गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली.
पतीपासून विभक्तवाशिमची ही २४ वर्षीय तरुणी बारावीपर्यंत शिकलेली आहे. दीड वर्षांपूर्वी ती पतीपासून विभक्त झाली असून, कंपनीत काम करून पुंडलिकनगरमध्ये एकटीच राहते. अनैतिक संबंधातून हे बाळ जन्मल्याने तिने हे कृत्य केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. खोलीत एकटीनेच बाळाला जन्म दिल्याचा दावा तिने केला. पोलिस त्याची खातरजमा करत आहेत. १४ ऑगस्ट रोजी तिने काही औषधे खरेदी केल्याची कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली आहेत.
बाळ सुरक्षितनागरिकांनी धाव घेईपर्यंत कुत्र्यांनी गोणी फाडण्याचा प्रयत्न सुरू केला. या ओढाताणीत पोते रस्त्यावर आले. एका कंपनीच्या बसच्या दोन्ही चाकांच्या मध्ये आले. यात बाळाच्या छातीला कुत्र्यांचे दोन दात लागून खोल जखम झाली आहे.