छत्रपती संभाजीनगर : शासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणाने समाजकल्याण विभागाच्या परीक्षेत इंटरनेटवरून उत्तरे कॉपी करण्याचा प्रयत्न केला. १८ मार्चला दुपारी चिकलठाण्यातील परीक्षा केंद्रात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. अक्षय फकिरचंद चव्हाण (वय ३१, रा. जवाहर काॅलनी) असे आरोपीचे नाव आहे.
मंगळवारी समाजकल्याण विभागाने निरीक्षक पदासाठी ऑनलाईन परीक्षा घेतली. १८ मार्च रोजी चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमधील आयऑन डिजिटल केंद्रात ही परीक्षा पार पडली. या दरम्यान अक्षय चलाखीने मोबाईल घेऊन आत गेला होता. अक्षयने सीपीयू मागे मोबाईल लपविला. एका उमेदवाराने लघुशंकेला जाण्याचे नाटक करीत ही बाब पर्यवेक्षकांच्या निदर्शनास आणून दिली. सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज पडताळणी केल्यानंतर ही बाब निदर्शनास आली. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन एमआयडीसी सिडको पोलिसांकडे धाव घेतली.
अभियांत्रिकीची पदवीएमआयडीसी सिडको पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षयने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली होती. परीक्षा केंद्रात मनाई असताना त्याने मोबाईल नेला. उत्तर शोधण्यासाठी गुगलचा वापर केला. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, नोटीस देऊन सोडून देण्यात आले. याप्रकरणी सहायक निरीक्षक कैलास लहाने पुढील कारवाई करीत आहेत.
पेपर फुटी, कॉपीची परंपराचस्पर्धा परीक्षेदरम्यान याच केंद्रामध्ये यापूर्वी अनेकदा पेपर फुटी, कॉपीचे प्रकार उघडकीस आले आहेत. पाचपेक्षा अधिक गुन्हे याप्रकरणी एमआयडीसी सिडको पाेलिस ठाण्यातच दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.