मोबाईलचा लळा; संस्कार पाळा!

By Admin | Published: September 20, 2014 11:35 PM2014-09-20T23:35:13+5:302014-09-21T00:30:10+5:30

बीड : एक काळ होता, जेंव्हा विद्यार्थी पुस्तके, दफ्तर यासाठी भांडायचे. आता सोशल मीडियाचा जमाना आहे. विद्यार्थ्यांना पुस्तकापेक्षा मोबाईलचे आकर्षण अधिक आहे.

Mobile phone; Follow the rites! | मोबाईलचा लळा; संस्कार पाळा!

मोबाईलचा लळा; संस्कार पाळा!

googlenewsNext



बीड : एक काळ होता, जेंव्हा विद्यार्थी पुस्तके, दफ्तर यासाठी भांडायचे. आता सोशल मीडियाचा जमाना आहे. विद्यार्थ्यांना पुस्तकापेक्षा मोबाईलचे आकर्षण अधिक आहे. येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट आॅफ पॉलिटेक्निक महाविद्यालयात आठ दिवसांपूर्वी मोबाईलबंदी करण्यात आली. मात्र, विद्यार्थ्यांतून याला तीव्र विरोध झाला. ‘लोकमत’ने हाच विषय घेऊन शनिवारी परिसंवाद घडवून आणला. यात प्राचार्य, पालक, विद्यार्थी संघटना, विद्यार्थिनी यांनी रोखठोक मते मांडली. मोबाईलची बंदी लादणे ही फक्त मलमपट्टी आहे. त्यासाठी मानसिकता बदलली पाहिजे. मोबाईलचा वापर हवा;पण तो चांगल्या गोष्टींसाठी असा सूर या परिसंवादातून उमटला.
‘सोशल मीडिया व विद्यार्थी’ या विषयावर ‘लोकमत’च्या कार्यालयात परिसंवाद झाला. महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या सविता शेटे, यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट आॅफ पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य शशिकांत डिकले, प्रा. योगेश्वरी भातलवंडे, पालक विक्रम थोरात, जिल्हा सहायक सरकारी वकील नामदेव साबळे, विद्यार्थिनी प्रतिनिधी सायली कोळेकर, शुभांगी मुठाळ, सामाजिक कार्यकर्ते संगमेश्वर आंधळकर, पंकज तांदळे, राहुल वाईकर, चिडीमार पथकातील कांता सोनवणे, मीरा रेडेकर यांनी चर्चेत सहभाग घेतला.
मोबाईल बंदी कशामुळे?
यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट आॅफ पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य शशिकांत डिकले यांनी सांगितले की, आमच्या महाविद्यालयात बहुतांश विद्यार्थी खेड्यातील आहेत. मात्र, ८० टक्के विद्यार्थ्यांकडे मोबाईल आहेत. पैकी, काहींकडे स्मार्टफोन आहेत. मोबाईलवरुन विद्यार्थीनींना अश्लिल मेसेज पाठविणे, गुपचूप व्हिडिओ रेकॉर्डींग करणे, छायाचित्रे काढणे व ते व्हॉटस् अ‍ॅप, फेसबुकवर टाकणे... अशर तक्रारी रोजच यायला लागल्या. विद्यार्थिनी व पालकांच्या या तक्रारींचा निपटारा करण्यातच बहुतांश वेळ वाया जाऊ लागला. सोशल मीडियाच्या गैरवापराने विद्यार्थिनींमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे आम्ही महाविद्यालयीन आवारात मोबाईल वापरण्यास विरोध केला. तेंव्हा काही विद्यार्थ्यांनी मोबाईलवापराच्या बंदीला विरोध केला. प्रकरण इतके टोकाला गेले की, शेवटी पोलिसांना पाचारण करावे लागले. त्यानंतर आम्ही सदरील विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावून त्यांना हकीगत सांगितली. तो विद्यार्थी घरातून बाहेर पडताना कॉलेजला जातोय असे सांगायचा;परंतु कॉलेजला न येता दुसरीकडेच असायचा.
आम्ही पालक व विद्यार्थी यांचा संवाद व्हावा यासाठी एक लँडलाईन क्रमांक उपलब्ध करुन दिलेला आहे. त्यावर संपर्क केल्यावर आम्ही विद्यार्थ्यांशी संपर्क करवून देतो. असे असतानाही मोबाईल वापरीण्याचा हट्ट का? यामुळे आम्ही महाविद्यालयाच्या आवारात मोबाईल वापरण्यास बंदी आणली. त्यानंतर एका विद्यार्थी संघटनेने विरोधही केला. मात्र, आमचा उद्देश चांगलाच आहे. या निर्णयानंतर पालक, विद्यार्थिनी यांनी कौतूक केले. आता आम्ही रोजच्या रोज विद्यार्थ्यांची तपासणी करतो, मोबाईल आढळल्यास तो जप्त करतो. पालक व विद्यार्थ्यांचे समुदपेशन करुन त्यांना फायदे- तोटे सांगतो.
फायद्या- तोट्याचेही बोलाच!
प्राचार्या सविता शेटे म्हणाल्या की, भावी पिढ्यांना विज्ञान- तंत्रज्ञानासोबतच रहावे लागणार आहे. त्यामुळे सोशल मीडिया, इंटरेनट या आता अपरिहार्य बाबी आहेत. त्याला आपण दूर नाही ठेवू शकत. पाल्यांच्या हाती मोबाईल सोपविताना आपण चांगल्या- वाईट गोष्टींची जाणिव करुन दिली पाहिजे. सोशल मीडियाचा वापर चांगल्याच कामासाठी व्हावा, असे वाटत असेल तर मानसिकता बदलावी लागेल. विवेकाचे भान ठेवून विद्यार्थ्यांना घडवावे लागेल. शाळांमधील विद्यार्थ्यांकडेही आता मोबाईल आहेत. मात्र, त्याचा वापर कसा आणि किती करायचा? हे प्रत्येकाने ठरविले पाहिजे. शाळेत मोबाईल वापरता येत नाही;पण अनेक शिक्षक अद्यापन करतानाही मोबाईलवर बोलत असतात. त्यामुळे महाविद्यालय आवारात मोबाईलच्या वापरास बंदी आणून चालणार नाही, तर त्याचा वापर चांगलाच व्हावा याकरता प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांवर बालपणापासूनच संस्कार आवश्यक आहेत. पालकांनी आपल्या मुंलासाठी वेळ दिलाच पाहिजे, अन्यथा पाल्य हाताबाहेर जाण्याची शक्यत असते. किशोरवयात मुलांना बंधने नको असतात. एखादी गोष्ट करुन नको, म्हटल्यावरही ते रिस्क घेतात. त्यामुळे तात्पुरती बंदी हा काही उपाय होऊ शकत नाही. योग्य वापर हाच उपाय आहे.
इतर शाळा- महाविद्यालयांनीही आदर्श घ्यावा
यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट आॅफ पॉलिटेक्निक महाविद्यालयाने महाविद्यालय आवारात मोबाईल वापराला बंदी आणली हे चांगलेच केले. हा निर्णय स्वागतार्ह आहे. इतर शाळांनीही हा उपक्रम हाती घ्यावा. त्यासाठी आम्ही शाळा- महाविद्यालयांना विनंती करु. आमच्या पद्धतीने वेळोवेळी याबाबत प्रबोधन करत असतो;पण विद्यार्थ्यांनीही चांगले काय, वाईट काय हे ओळखले पाहिजे असे सामाजिक कार्यकर्ते संगमेश्वर आंधळकर, राहुल वाईकर यांनी सांगितले. निर्भिड शिक्षण हा विद्यार्थ्यांचा हक्क आहे. त्यामुळे विद्यार्थिनींनी देखील निडरपणे शिक्षण घ्यावे.
बंदी उपाय नाही
एआयएसएफचे पंकज तांदळे म्हणाले, महाविद्यालय आवारात मोबाईलवर बंदी आणणे हा उपाय नाही होऊ शकत. चांगला वापर करणारेही विद्यार्थी आहेत. सर्वांकडे संशयाच्या नजरेने पाहणे चुकीचे आहे.
पालकांनी काळजी घ्यावी
मुलांकडे मोबाईल देताना त्याचा गैरवापर होणार नाही, याची काळजी पालकांनी घ्यावी. मोबाईलमध्ये अश्लिल चित्र, क्लिन असतील तर थेट संवाद साधला पाहिजे. चांगल्या- वाईट बाबी समजून सांगितल्या पाहिजेत, अशी अपेक्षा चिडीमार पथकातील कांता सोनवणे, मीरा रेडेकर यांनी व्यक्त केली.
एकूणच चर्चेचा सूर होता मोबाईल वापरायला हरकत नाही;पण वापर चांगला हवा. त्यासाठी संस्कार महत्त्वाचे आहेत. (प्रतिनिधी)४
प्रा.योगेश्वरी भातलवंडे म्हणाल्या, गुपचूप फोटो काढणे, मिस्डकॉल देणे, मेसेच पाठविणे याला आळा बसावा यासाठी आम्ही मोबाईल बंदीच्या निर्णयापर्यंत आलो. सीसीटीव्ही आहे;पण लक्ष कोणाकोणाकडे द्यायचे? त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोबाईलपेक्षा अभ्यासाची स्पर्धा केल पाहिजे. मोबाईल वापरायस बंदी आणल्यापासून विद्यार्थी अतिशय एकाग्रतेने अध्ययन करतात. त्यामुळे गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल.परिसंवाद...
बीड लोकमत कार्यालयात शनिवारी ‘विद्यार्थी व सोशल मीडिया’ या विषयावर परिसंवाद झाला. यावेळी प्राचार्या सविता शेटे, प्राचार्य शशिकांत डिकले, प्रा. योगेश्वरी भातलवंडे, पालक विक्रम थोरात, सहायक सरकारी वकील नामदेव साबळे, विद्यार्थिनी प्रतिनिधी सायली कोळेकर, शुभांगी मुठाळ, सामाजिक कार्यकर्ते संगमेश्वर आंधळकर, पंकज तांदळे, राहुल वाईकर, चिडीमार पथकातील कांता सोनवणे, मीरा रेडेकर आदी.
विद्यार्थिनी प्रतिनिधी सायली कोळेकर, शुभांगी मुठाळ यांनी सांगितले की, पूर्वी आम्ही सतत धास्तावलेल्या असायचो. कोणी फोटो काढील का? तो फोटो सोशल मीडियावरुन कोठे अपलोड होतो का? अशी भीती असायची. मोबाईल वापरात बंदी आणल्यापासून आम्हाला भीतीच उरली नाही. आम्ही आता बिनधास्त वावरतो. कधी सोशल मीडियाचा वापर नाही केला; पण मोबाईल महाविद्यालयात न नेल्याने आमची अभ्यासातील एकाग्रता देखील वाढली़
पालक विक्रम थोरात म्हणाले, महाविद्यालयात मोबाईल वापरावर बंदी आणली ही चांगलीच बाब आहे. मोबाईलमुळे विद्यार्थ्यांची एक ाग्रता भंग पावते. त्यामुळे मोबाईलचा वापर महाविद्यालयाच्या आवारात नको तर तो घरी हवा. कारण सोशल मीडियात सारे वाईटच आहे असे नाही. अनेकदा विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम व इतर काही माहिती नेटवरुन घ्यावी लागते. त्यासाठी मोबाईल, इंटरनेट याला आपण टाळू शकत नाही. शिक्षकांप्रमाणचे पालकांनीही आपली जबाबादरी ओळखली पाहिजे.
सहायक सरकारी वकील अ‍ॅड. नामदेव साबळे म्हणाले, मोबाईलच्या गैरवापराचे परिणाम वाईट आहेत़ महाविद्यालयात मोबाईल नसलेच पाहिजेत. गैरवापर करणाऱ्यांविरुध्द आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हे नोंद होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र पोलिसांनाच तांत्रिक बाबी माहीत नसतात. त्यामुळे मोबाईलचा वापर मर्यादितच असावा. सायलेंट झोनमध्ये मोबाईल वाजल्यास १०० रुपयांपर्यंत दंड होतो. तशाच पद्धतीने महाविद्यालयांनीही कायदा- सुव्यवस्था राखण्यासाठी बंदी आणली तर त्यात चुकीचे काहीही नाही.

Web Title: Mobile phone; Follow the rites!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.