औरंगाबाद: शहराच्या पाणी प्रश्नावर मनसे आक्रमक झालेली पाहायला मिळाली. शहराला आठवडाभरात किमान दोन वेळा पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी मनसेने नुकतीच केली होती. ही मागणी 10 दिवसात मान्य न झाल्यास मनपा आयुक्तांच्या शासकीय बंगल्याचे नळ कनेक्शन तोडू असा इशारा मनसेचे जिल्हा संघटक बिपिन नाईक, वैभव मिटकर यांनी दिला होता. त्यानुसार आज पहाटे मनसे पदाधिकाऱ्यांनी हे नळ कनेक्शन तोडले.
गेल्या पंधरवड्यात मनसेने पाणीपट्टी कमी करा, किमान दोन दिवसाआड पाणीपूरवठा करा, या मागणीसाठी पत्रकार परिषद घेऊन आयुक्तांना इशारा दिला होता. आठ-आठ दिवस पाणीपुरवठा होत नसल्याने सामान्य नागरिकांचे जे हाल होत आहेत, त्याला पालिकेचे ढिसाळ नियोजन जबाबदार आहे. असा आरोप मनसेने केला होता. दोन दिवसांपूर्वी आयुक्त पांडेय यांना पत्र देऊन मनसेने अलर्ट केले होते.
शहरातील काही वसाहतींना पाचव्या दिवशी तर काही वसाहतींना थेट दहाव्या दिवशी पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पाणीपुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी पहाटे मनपा प्रशासकांच्या दिल्ली गेट येथील निवासस्थानात जाणारे पाण्याचे कनेक्शन तोडले. मुळातच मनसेकडून तोडण्यात आलेले नळ कनेक्शन बंगल्याच्या उद्यानातील झाडांसाठी एका विहिरीवरून घेण्यात आले होते. मागील काही वर्षापासून याचा वापरही नाही. याप्रकरणी मनसे कार्यकर्त्यांवर सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया मनपाने दुपारनंतर सुरू केली.