हिंगोली : मागील आठवड्यात तीन-चार वेळेस पाऊस आल्याने नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला होता. सध्या या आठवड्यात सुर्य आग ओकू लागल्याने जिल्ह्याच्या तापमानाचा पारा मंगळवारी ४३ अंशावर गेला. दुपारी वारा कमी होताच उकड्याने नागरिकांचे हाल झाले. उन्हाळ्यातील प्रत्येक आठवड्यात हलक्या का होईना पावसाने हजेरी लावली आहे. आता पावसाळा जवळ येत असताना उन्हाची तिव्रत्ता वाढत आहे. मागील दोन दिवसांत अधिक उन असल्याने नागरिकांचे हाल झाले. रविवारी ४२ अंशावर पारा गेला होता. उन्हामुळे दुपारी घराबाहेर पडणे नागरिकांनी टाळल्याने रस्ते निर्मनुष्य झाले होते. दिवसभर कडक उन पडल्यानंतर तापमान कमी होताच साडेतीन वाजेच्या दरम्यान जोरदार वारा सुटला. जवळपास १० ते १५ मिनीटे वारा वाहिल्यानंतर हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या. त्यानंतर रात्री १२ वाजेच्या सुमारास सोसाट्याचा वारा सुटला. जवळपास १० मिनीटे या वार्याने धावपळ उडाली. सोमवारी तापमानाचा पारा एक अंशाने घसरल्याने ४१ अंश कमाल तापमानाची नोंद करण्यात आली होती. मंगळवारी सकाळपासून सुर्याने आग ओकण्यास सुरूवात केली. दुपारी तापमानात आणखीच भर पडून कमाल तापमानाचा पारा ४३ अंशावर गेला. त्यामुळे दुपारी शहरातील अनेक दुकाने बंद होती. बसस्थानकात गर्दी दिसून आली नाही. किमान तापमानाची नोंद ३० अंश सेल्सिअसची झाली. मंगळवारप्रमाणे बुधवारी देखील तापमान कायम राहण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
जिल्ह्याचा पारा ४3 अंशावर
By admin | Updated: May 28, 2014 00:41 IST